स्वर आणि सुरांची अद्वितीय गुंफण
By Admin | Updated: March 24, 2015 00:29 IST2015-03-24T00:29:23+5:302015-03-24T00:29:23+5:30
‘स्वर’ आणि ‘सुरां’च्या अद्वितीय गुंफणीतून गीतांची तेजोमयी मालिका प्रज्वलित होत ‘स्वरज्योती’चा उत्कट आविष्कार सोमवारी रसिकांनी अनुभवला.

स्वर आणि सुरांची अद्वितीय गुंफण
ज्योत्स्ना दर्डा यांना ‘स्वरज्योती’तून श्रद्धांजली : लोकमत सखी मंचतर्फे सांगीतिक कार्यक्रम
पुणे : ‘स्वर’ आणि ‘सुरां’च्या अद्वितीय गुंफणीतून गीतांची तेजोमयी मालिका प्रज्वलित होत ‘स्वरज्योती’चा उत्कट आविष्कार सोमवारी रसिकांनी अनुभवला. अमर ओक यांची ‘मंजूळ’ बासरी आणि युवा गायक राहुल देशपांडे यांची ‘सिद्धहस्त’ गायकी अशा अद्भुत स्वरमैफलीमध्ये रसिकजन हरवून गेले.
निमित्त होते, ज्योत्स्ना दर्डा यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त लोकमत सखी मंचच्या वतीने आयोजित ‘स्वरज्योती’ या सांगीतिक कार्यक्रमाचे. गरवारे कॉलेज येथील असेंब्ली हॉलमध्ये असंख्य रसिकांच्या उपस्थितीमध्ये हा स्वरसोहळा रंगला. (स्व.) ज्योत्स्ना दर्डा यांच्या भगिनी सुशीला बंब, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई, महाव्यवस्थापक मिलन दर्डा, युवा गायक राहुल देशपांडे आणि बासरीवादक अमर ओक यांच्या हस्ते दीप्रज्वलन आणि (स्व.) ज्योत्स्ना दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून मैफलीस प्रारंभ झाला.
‘अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र...’ पुंडलिक वरदे हरी विठ्ठल... श्री ज्ञानदेव तुकाराम’च्या गजरामध्ये राहुल देशपांडे आणि अमर ओक यांनी स्वर व बासरीतील मधुर सुरांच्या भावोत्कट मिलाफातून मैफलीस प्रारंभ केला. आजोबा डॉ. वसंतराव देशपांडे यांची ‘तू सुखकर्ता तू दु:खहर्ता’ ही गणेशवंदना आणि श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेले ‘बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात’ हे भावगीत सादर करून राहुल यांनी उपस्थितांची दाद मिळविली. ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ या अमर ओक यांनी बासरीवर वाजविलेल्या सुरांमधून शब्दांमधील वेदना रसिकांनी अनुभवली. तर ‘काय बाई सांगू कसं गं सांगू’ या त्यांच्या हलक्या फुलक्या शब्दस्ुूरांनी वातावरणात ‘सुरेल’ रंग चढविला. ‘दयाघना’ हे हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले गीत राहुल आणि अमर ओक यांनी एकाच वेळी सादर केले. अभंग, नाट्यसंगीत, शास्त्रीय आणि उपशास्त्रीय अशा संगीताच्या विविध प्रकारांवर उत्तम प्रभुत्व असलेल्या राहुल देशपांडे यांनी ‘बात निकलेगी तो दूर तलक जाएगी’ या गझलची नजाकत पेश करीत रसिकांना अचंबित केले.
या दोन्ही प्रतिभावंत कलाकारांच्या मैफलीच्या चढलेल्या रंगात अमर ओक यांनी बासरीवर सादर केलेल्या ‘मधुबन में राधिका नाचे’ या शास्त्रीय गायकीतील अंगाच्या वादनाने अधिकच भर टाकली. त्या उत्कृष्ट सादरीकरणाने रसिकांना ‘वन्स मोअर’चा जल्लोष करण्यास भाग पाडले. ए. आर. रेहमान यांच्या ‘तू ही रे’ स्वरांची मंजूळ गुंजनही रसिकांनी बासरीवर अनुभवली.
राहुल देशपांडे यांनी गोरक्षनाथांची ‘निर्गुण रचना’ त्याच भक्तिपूर्ण शैलीत सादर करून रसिकांची मने जिंकली.
‘मोगरा फुलला,’ ‘पैल तोगे काऊ’ या विराणी गीतांची शृंखला अमर ओक यांनी बासरीतून गुंफली. ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ या गीतांद्वारे दोघांनी मैफलीचा समारोप केला.
मिलिंद कुलकर्णी यांच्या ओघवत्या शैलीतील, अभ्यासपूर्ण निवेदनाने मैफलीला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली.
राहुल देशपांडे आणि अमर ओक यांना तबल्यावर निखिल फाटक, ड्रम आणि तबल्यावर विक्रम भट, पखवाजवर ओंकार दळवी, टाळेवर माऊली टाकळकर, संवादिनीवर राहुल गोळे व सिंथेसायझरवर केदार परांजपे यांनी साथसंगत केली.
(प्रतिनिधी)
संकटांचा सामना करण्याची गरज : सुशीला बंब
४ज्योत्स्नाला नेहमीच महिलांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. महिलांमधील कलागुण आणि त्यांच्या विचारांना चालना मिळावी, या उद्देशाने तिने लोकमत सखी मंचची स्थापना केली. आज तिने लावलेल्या रोपट्याचे एवढ्या मोठ्या वटवृक्षात झालेले हे रूपांतर पाहून खूप आनंद होत आहे. वैयक्तिक आयुष्यात स्त्री व पुरुष दोघांनी येणाऱ्या संकटांचा धडाडीने सामना करण्याची गरज असल्याची भावना सुशीला बंब यांनी व्यक्त केली.