अस्वस्थ शिवसेनेचे ‘तळ्यात-मळ्यात’!
By Admin | Updated: February 12, 2015 05:18 IST2015-02-12T05:18:22+5:302015-02-12T05:18:22+5:30
भाजपाचे कॅबिनेट मंत्री शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना अधिकार देत नाहीत, मुंबई महापालिकेत विश्वासात न घेता शासकीय पातळीवरून परस्पर निर्णय घेतले जातात आणि केंद्रातील आणखी एका मंत्रीपदाबाबत

अस्वस्थ शिवसेनेचे ‘तळ्यात-मळ्यात’!
मुंबई : भाजपाचे कॅबिनेट मंत्री शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना अधिकार देत नाहीत, मुंबई महापालिकेत विश्वासात न घेता शासकीय पातळीवरून परस्पर निर्णय घेतले जातात आणि केंद्रातील आणखी एका मंत्रीपदाबाबत विचारणाही केली जात नाही. अशा परिस्थितीत सत्तेत राहून स्वत:ची घुसमट करून घ्यायची की, कोणतेही अधिकार नसलेली वांझोटी सत्ता सोडायची, याबाबत शिवसेनेचे तळ्यात-मळ्यात सुरु असतानाच भाजपाच्या नेत्यांनी आक्रमक होत शिवसेनेची इच्छा नसेल तर बाहेर पडावे, अशी भूमिका घेतल्याने शिवसेना पक्ष नेतृत्व संभ्रमात असल्याचे समजते.
केंद्र आणि राज्यातील सत्तेत शिवसेना सहभागी असली, तरी वाट्याला आलेली खाती तशी ‘बिनकामाची’ असल्याची भावना सेनेच्या मंत्र्यांमध्ये आहे. दोन वर्षांनी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. मुंबईतील प्रकल्पांबाबत महापालिकेच्या परस्पर निर्णय घेतले जात आहेत, असा महापौरांचा आक्षेप आहे. तर भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून अधिकार दिले जात नाहीत, अशी सेनेच्या राज्यमंत्र्याची तक्रार आहे. अधिकार देण्यावरून महसूलमंत्री एकनाथ खडसे व त्यांच्या खात्याचे राज्यमंत्री संजय राठोड यांच्यात कडाक्याचे भांडण झाल्याचे समजते. राठोड यांनी हीच कैफियत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली. या सर्व प्रकारामुळे शिवसेनेत खदखद सुरू आहे.
अशा पद्धतीने महापालिका निवडणुकांपर्यंत सत्तेवर राहिलो आणि ऐनवेळी भाजपाने युती न करता दगा दिला तर सत्तेमुळे आलेली अँटीइन्कम्बन्सी शिवसेनेला चिकटेल आणि भाजपा आपल्याला राष्ट्रवादी अथवा मनसेशी हातमिळवणी करून भुईसपाट करील, अशी भीती शिवसेनेतील अनेकांना सतावत आहे. त्यामुळे गपगुमान सत्तेत राहायचे की, संघर्ष करण्याकरिता रस्त्यावर उतरायचे याचा निर्णय घेण्याचा आग्रह आमदारांकडून धरला जात आहे. शिवसंपर्क मोहिमेच्या निमित्ताने विदर्भ व मराठवाड्यातील शिवसेना आमदारांची बैठक पुढील आठवड्यात बोलावण्यात आली असून त्यावेळी या विषयावरही चर्चा अपेक्षित आहे. (विशेष प्रतिनिधी)