मुुंबई पोलिसांच्या रडारवर पुन्हा अंडरवर्ल्ड
By Admin | Updated: September 11, 2014 03:27 IST2014-09-11T03:27:44+5:302014-09-11T03:27:44+5:30
मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या रडारवर अंडरवर्ल्डला घेतले आहे. अंडरवर्ल्डमधल्या बहुतांश टोळ्यांचे म्होरके परदेशात आहेत

मुुंबई पोलिसांच्या रडारवर पुन्हा अंडरवर्ल्ड
मुंबई : मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या रडारवर अंडरवर्ल्डला घेतले आहे. अंडरवर्ल्डमधल्या बहुतांश टोळ्यांचे म्होरके परदेशात आहेत. मात्र त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिले आहेत.
मुंबईत सक्रिय असलेल्या प्रत्येक छोट्यामोठ्या संघटित टोळ्यांचे आत-बाहेर असलेले गँगस्टर, खटल्याच्या तारखांना भाईच्या भेटीसाठी न्यायालयात गर्दी करणारे नंबरकारी, कारागृहांमध्ये डबे आणि अन्य वस्तू घेऊन जाणारे डबेवाले, निरोपे यांच्यासह या टोळीकडे आकृष्ट झालेले तरुण, टोळीकडे झुकलेले व्यावसायिक, उद्योगपती या मोठ्या साखळीमागे मारियांच्या आदेशानंतर पोलिसांचा ससेमिरा लागण्याची दाट शक्यता आहे. यातही खंडणी कोणाकडे मागावी यापासून सुपारी, सेटलमेन्ट, रिअल इस्टेटमधली गुुंतवणूक याबाबत टोळ्यांना माहिती पुरविणारे पोलिसांचे मुख्य लक्ष्य असेल, असे मारियांनी स्पष्ट केले.
बिटू सिंगविरोधात रेड कॉर्नर
बॉलीवूड निर्माते अली मोरानी यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात नाव पुढे आलेल्या परदेशस्थित इव्हेन्ट मॅनेजर बिटू सिंग याच्या नावे मुंबइ गुन्हे शाखा लवकरच रेड कॉर्नर नोटीस जारी करणार आहे. पोलीस आयुक्त मारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार मोरानी गोळीबार प्रकरणात नाव पुढे आल्यानंतर सिंग यांच्याकडे चौकशी करणे क्रमप्राप्त झाले. मात्र ते परदेशात असल्याने रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात येणार आहे. हॅपी न्यू ईयर या हिंदी चित्रपटाच्या प्रसारण हक्कावरून सिंग आणि मोरानी यांच्यात खटपट झाली. त्यानंतर अंडरवर्ल्डकडून मोरानींच्या निवासस्थानी गोळीबार केला होता. (प्रतिनिधी)