आरोपांची तोफ डागताना प्रचाराबाबत अंडरस्टँडिंग!
By Admin | Updated: October 9, 2014 04:31 IST2014-10-09T04:31:37+5:302014-10-09T04:31:37+5:30
निवडणुकीच्या आखड्यात एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडणारे नेते एकमेकांच्या मतदारसंघात जावून बोलण्याचे मात्र टाळत आहेत

आरोपांची तोफ डागताना प्रचाराबाबत अंडरस्टँडिंग!
मुंबई : निवडणुकीच्या आखड्यात एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडणारे नेते एकमेकांच्या मतदारसंघात जावून बोलण्याचे मात्र टाळत आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांची बारामतीत तर अजित पवार यांची दक्षिण कऱ्हाडमध्ये सभा घेण्याचे कुठलेही नियोजन नसल्याचे दोघांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवारांना चांगलेच टार्गेट केले आहे. तर चव्हाण यांनी शेवटच्या सहा महिन्यांमध्ये घेतलेल्या निर्णयांची चौकशी व्हावी, अशी मागणी करून अजितदादांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे. पण दोघेही परस्परांच्या मतदारसंघात अद्याप गेलेले नाहीत.
दक्षिण कऱ्हाडमध्ये राष्ट्रवादीने उंडाळकर यांना पाठिंबा दिला असला तरी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एकही बडा नेता उंडाळकर यांच्यासाठी प्रचारात उतरलेला नाही. तिकडे अजित पवार यांच्याशी ज्यांचे विशेष मैत्र असल्याचे बोलले जाते ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बारामतीचा रस्ता अद्याप धरलेला नाही. गडकरी मैत्री निभावत असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंची अद्याप बारामतीत सभा झालेली नाही. तसे काही नियोजन नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. शिवसेनेतर्फे पवारांविरुद्ध केवळ खा.गजानन कीर्तीकर यांची प्रचार सभा झाली आहे.
नंतर जानकर यांनी या बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ‘राष्ट्रवादी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत येऊ शकेल, असे वाटत असल्याने आपण बारामतीत आलो नाही’, असे मोदींनीच आपल्याला नंतर सांगितल्याची माहिती जानकर यांनी दिली होती.