सानपाड्यात गुन्हेगार समजून पकडलेले निघाले दारुडे
By Admin | Updated: June 7, 2016 07:42 IST2016-06-07T07:42:00+5:302016-06-07T07:42:00+5:30
वाहतूक पोलिसांकडून वाहनांची झाडाझडती सुरू असतानाच काही अंतरावरून एक कार विरुध्द दिशेने पळाली.

सानपाड्यात गुन्हेगार समजून पकडलेले निघाले दारुडे
नवी मुंबई : वाहतूक पोलिसांकडून वाहनांची झाडाझडती सुरू असतानाच काही अंतरावरून एक कार विरुध्द दिशेने पळाली. हे पाहताच त्या कारमध्ये नक्कीच गुन्हेगार असल्याचे समजून वाहतूक पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. अखेर सानपाडा येथे त्यांना पकडल्यानंतर ते दारू प्यायलेले असल्यामुळे पळाल्याचे उघड झाले.
रविवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पामबीच मार्गावर सारसोळे जंक्शनच्या ठिकाणी हा प्रकार घडला. शहरात सध्या वाहतूक पोलिसांच्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाया सुरू आहेत. त्यानुसार सीवूड वाहतूक शाखेचे काही पोलीस त्याठिकाणी वाहनचालक दारू प्यायलेले आहेत काही नाही याची चाचणी घेत होते. याचदरम्यान वाशीकडून सीबीडीच्या दिशेने जाणारी एक स्कॉर्पिओ कार त्यांच्यापासून काही अंतरावर थांबून क्षणातच विरुध्द दिशेने जावू लागली. त्यांची ही गैरहालचाल वाहतूक पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही. पोलिसांना पाहून पळ काढणारे नक्कीच गुन्हेगार असावेत असा त्यांचा समज झाला. यानुसार बंदोबस्तावर असलेल्या बहुतांश सर्वच वाहतूक पोलिसांनी मोटारसायकलीवरून स्कॉर्पिओचा पाठलाग सुरु केला. परंतु काही केल्या कार थांबतच नसल्यामुळे पोलिसांनीही अखेरपर्यंत पाठलाग सुरूच ठेवला. यादरम्यान विरुध्द दिशेने धावणाऱ्या कारची इतर वाहनांना धडक लागून गंभीर अपघाताची देखील शक्यता होती. तसे काही प्रसंग देखील यादरम्यान घडले. अखेर सानपाडा येथील मोराज सर्कलपासून पेट्रोल पंपाच्या दिशेने ही कार वळली असता हा पाठलाग संपला. पुढे रस्ता असेल या अंदाजाने कारचालक त्या मार्गावर आले असता पुढचा मार्ग बंद असल्यामुळे काही दक्ष नागरिकांनी व वाहतूक पोलिसांनी कारमधील दोघांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी त्यांची चौकशी केली असता ते दारू प्यायलेले असल्यामुळे कारवाईच्या भीतीने पामबीच मार्गाने विरुध्द दिशेने पळाल्याची कबुली त्यांनी दिल्याचे सहाय्यक निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले.
महेश चौधरी (२३) व निखील चौधरी (२२) अशी त्यांची नावे असून दोघे चुलत भाऊ आहेत. निखील हा गोरेगावचा राहणारा असून तो स्कॉर्पिओ (एमएच ०२ बीआर ९८८३)कारने आजीला घेवून सानपाडा येथे महेशच्या घरी आला होता. यानंतर दोघांनी एकत्र मद्यपान केल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी पामबीच मार्गे नेरुळच्या दिशेने चालले होते. दरम्यान, सारसोळे जंक्शनच्या ठिकाणी वाहतूक पोलीस ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाया करत असल्याचे पाहून त्यांनी विरुध्द दिशेने कार पळवली होती. याप्रकरणी त्यांच्याविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे वाहतूक पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. (प्रतिनिधी)
>..तर दुर्घटना घडली असती
नवी मुंबईचा नेकलेस म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पामबीच मार्गावर सतत छोटे-मोठे अपघात घडतच असतात.
अशावेळी मार्गावर विरुध्द दिशेने वाहन चालवणे गंभीर दुर्घटनेला निमंत्रण देणारे ठरु शकले असते.
तरीही दारुच्या नशेत निखील भरधाव वेगात विरुध्द दिशेने स्कॉर्पिओ पळवत होता.
त्याच्या गैरहालचालीवर पोलिसांना संशय आल्याने त्याला अटकाव घालण्यासाठी पोलिसांना पाठलाग करावा लागला.
अखेर त्यांची कार ज्या मार्गावर गेली तो मार्गच पुढे बंद असल्याने दोघेही पोलिसांच्या हाती लागले.
सुदैवाने या थरारक पाठलागाचे गंभीर अपघातामध्ये रुपांतर झाले नाही.