मुलांना समजून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2017 02:32 IST2017-03-02T02:32:00+5:302017-03-02T02:32:00+5:30
मुले शाळेत जायला लागल्यापासून परीक्षा देत असतात. दहावी अथवा बारावी ही काय पहिली परीक्षा नसते

मुलांना समजून घ्या
-पूजा दामले
परीक्षेच्या काळात घरी वातावरण कसे हवे?
मुले शाळेत जायला लागल्यापासून परीक्षा देत असतात. दहावी अथवा बारावी ही काय पहिली परीक्षा नसते. त्यामुळे अन्य परीक्षेच्या काळात नॉर्मल वातावरण घरी असते, तसेच वातावरण असावे. पाल्य हे परीक्षेला जात आहे युद्धावर नाही, हे पालकांनी लक्षात ठेवले पाहिजे. बोर्डाची परीक्षा असल्यामुळे त्याला महत्त्व आहे, पण म्हणून घरात उगाच वेगळी वातावरणनिर्मिती केली तर मुलांवरचा ताण वाढून त्याचा परिणाम परीक्षेवर होऊ शकतो. घरातल्या सगळ्यांनी रात्री एकत्र जेवा. जेवताना मुलांशी संवाद साधा. त्यात सर्वसामान्य विषय, त्यांना आवडणारे विषय असू द्या.
पालकांना अपेक्षा असतात, त्याबद्दल काय सांगाल?
पालकांनी अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही, पण चुकीच्या अथवा अवास्तव अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे, हा फरक पालकांनी लक्षात घेतला पाहिजे. आपल्या नातेवाइकांच्या मुलांना, शेजारच्या मुलांना किती टक्के गुण मिळाले, त्यांनी किती अभ्यास केला, यावरून आपल्या मुलांवर अपेक्षाचे ओझे लादू नका. आपल्या मुलाच्या आवडीनिवडी बघा, त्याचा कल लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या आकलन शक्तीचा विचार करून अपेक्षा ठेवा. मुलांना समजून घ्या. त्याचे म्हणणे ऐकून घ्या. मुलांना भीती वाटली, ताण आला तर पालकांशी संवाद साधतील इतके पोषक वातावरण घरात असणे आवश्यक आहे. यासाठी पालकांनी अधिक प्रयत्न केले पाहिजेत.
पालकांनी मुलांशी कसे वागले पाहिजे?
परीक्षेच्या काळात मुलांना कौटुंबिक आधाराची गरज असते. अभ्यास झाला असला आणि झाला नसला तरीही घरच्यांनी मुलांना आधार दिला पाहिजे. यासाठी घरात एकोपा आणि एकमत असणे आवश्यक आहे. घरातले वेळापत्रक चुकणार नाही याची काळजी पालकांनी घेणे आवश्यक आहे. एक जण म्हणेल टीव्ही पाहू दे, दुसरा नको म्हणेल तर वाद होऊन तणाव वाढू शकतो. या काळात परीक्षा, गुण आणि भविष्याविषयी चर्चा करणे टाळावे. तू करू शकतोस/ शकतेस हा विश्वास पालकांनी मुलांमध्ये निर्माण करयला हवा. आपले पाल्य हे इतरांपेक्षा वेगळे असून, त्याचा आपल्याला अभिमान आहे. काहीही झाले तरी आपले पालक आपल्या बरोबर आहेत हा विश्वास मुलामध्ये पालकांनी निर्माण करायला हवा.
परीक्षेला जाताना काय करावे?
बोर्डाची परीक्षा असली तरी पहिली आणि शेवटची परीक्षा नाही, हे मुलाने लक्षात ठेवले पाहिजे. परीक्षेला जायच्या आधी एक तास अभ्यास बंद करावा. घरातून निघताना शांतपणे घराबाहेर पडावे. परीक्षा केंद्रावर गेल्यावर मित्रांनी किती अभ्यास केला, हे येतं का अशा चर्चा करू नयेत. हातात पेपर आल्यावर शांतपणे पूर्ण पेपर वाचावा. पहिल्या प्रश्नाचे उत्तर येत नसले तर पुढील प्रश्न वाचावा. घाबरून जाऊ नये. असे झाल्यास केलेला अभ्यासही आठवत नाही. ऐनवेळी ब्लँक व्हायला झाल्याने अजूनच भीती वाटू लागते. अशावेळी पाणी प्यावे, दीर्घ श्वास घ्यावा, आपल्या आवडत्या देवाचे नाव घ्यावे, शांत बसावे आणि पेपर सोडवायला घ्यावा. कारण आपल्या मेंदूमध्ये एक वर्षापूर्वी वाचलेला अभ्यास, केलेल्या गोष्टी आठवण्याची शक्ती आहे. पण त्याचा वापर करून घेण्यासाठी शांत राहणे आवश्यक आहे.
>पालकांनी कोणत्या विषयावर बोलणे टाळावे?
पालकांनी मुलांना ताण येणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे. पालकांनी मुलांशी संवाद साधताना त्याच्या मनात काय चालले आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मुलांच्या सवयीनुसार वागल्यास उत्तम. पेपर देऊन बाहेर आल्यावर पाल्यावर प्रश्नांचा भडिमार करणे, झालेल्या पेपरविषयी चर्चा करणे टाळावे. त्या पेपरची उत्तरे मुलांना विचारणे टाळावे. मुलांना अनेकदा भूक लागलेली असते, तहान लागलेली असते. त्यामुळे त्यांना काही खायला, प्यायला हवे आहे का? हे विचारावे. पुढचा पेपर कधी आहे, त्याचा अभ्यास कसा करणार याविषयी बोलावे. पेपरच्या आदल्या दिवशीच बॅग भरून ठेवावी. त्यामुळे घाई होत नाही.
मुलांचा ताण वाढू नये म्हणून काय करावे?
मुलांना परीक्षा आहे, म्हणून १२-१२ तास अभ्यास करायला लावू नये. मुलांना स्वत:साठी वेळ हवा. रोज एक तास व्यायाम, पोहणे, दोरीच्या उड्या, योगा असे करायला सांगावे. यामुळे मुलांना बदल मिळतो आणि ते फ्रेश होतात. त्यांचा ताण कमी होतो. त्यांना त्यांच्या जवळच्या मित्रांशी बोलण्याने बरे वाटणार असेल तर त्यांना बोलू द्या. जे नातेवाईक उगाच ताण वाढवणार असतील त्यांच्याशी बोलणे टाळा. परीक्षेवेळी घरात नेहमीची माणसेच असतील असे बघा. पाहुणे आल्यास वेळापत्रक बिघडू शकते. त्याची परीक्षा आहे म्हणून त्यांना एकटे टाकू नका. त्यामुळे त्यांचा ताण कमी होण्यास मदत होईल.