राधाच्या आक्रमतेपुढे एसटी चालक-वाहक नमले
By Admin | Updated: July 9, 2016 17:50 IST2016-07-09T17:50:08+5:302016-07-09T17:50:08+5:30
गावात बस आलीच पाहिजे असा आक्रमक पवित्रा ‘राधा’ या १२ वीत शिकणा-या तरुणीने घेतला आणि तिच्या त्या आक्रमकतेपुढे एसटी चालकाला नमते घ्यावे लागले

राधाच्या आक्रमतेपुढे एसटी चालक-वाहक नमले
>भाऊराव शिंदे / ऑनलाइन लोकमत -
उपळवटेत सुरू झाली एसटी : विद्यार्थ्यांची झाली सोय
सोलापूर, दि. 09 - गावात उच्च शिक्षणाचा अभाव असल्याने पुढील शिक्षणासाठी शहराचा शोध घ्यायचा. महाविद्यालयात प्रवेश मिळाला तर जायचे कसे हा प्रश्न. कारण गावात बसची सोय नाही, मग रोजचीच पायपीट.. असे किती दिवस हे सहन करायचे, गावात बस आलीच पाहिजे असा आक्रमक पवित्रा ‘राधा’ या १२ वीत शिकणा-या तरुणीने घेतला आणि तिच्या त्या आक्रमकतेपुढे एसटी चालकाला नमते घ्यावे लागले. केवळ राधाच्या धाडसामुळे उपळवटे (ता़ माढा) येथे एस़ टी़ आली आहे.
उपळवटे एक खेडेगाव़ केवळ आठवीपर्यंत शिक्षणाची सोय़ गावात सोयीसुविधांचा अभाव. त्यामुळे ग्रामस्थांना हरेक गोष्टीसाठी बाहेरगावी किंवा शहराच्या ठिकाणी जावे लागते. शिक्षण घेऊन इच्छिना-यांना तर अनेक संकटाचा सामना करावा लागतो, त्यात मुलींनी शिक्षण घेणे तर महाकठीच. आठवी झाल्यानंतर अनेकांना शिक्षणाची दारे बंद होतात. पुढील शिक्षण घ्यायचे म्हटले तर बाहेरचा रस्ता धरावा लागतो. सध्या गावातील ८० ते ९० विद्यार्थी रोज केम, टेंभुर्णी, इंदापूर, अकलूज, कुर्डूवाडी या ठिकाणी ये-जा करतात. उपळवटे हे गाव केम-टेंभुर्णी मार्गापासून दोन किमी आत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोज दोन किमी चालत येऊन एस़टी किंवा मिळेल त्या वाहनाने जावे लागते. गावात एस़ टी़ सुरु करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी अनेकवेळा केली मात्र तात्पुरती सुरू होऊन बंद झाली. विद्यार्थ्यांचे हाल सुरूच होते.
शुक्रवारी नेहमीप्रमाणे उपळवटे येथील राधासह अनेक विद्यार्थी-विद्यार्थीनी केम-टेंभुर्णी एस़ टी़ मध्ये बसले होते. उपळवटे फाटा आल्यानंतर सर्व विद्यार्थी उतरु लागले, मात्र राधाने वाहक व चालकास एस़ टी़ उपळवटे येथे नेण्यास सांगितले अन्यथा मी बसमधून उतरणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. बस पुढे तशीच दहिवलीकडे मार्गस्त झाली, तोपर्यंत राधाने गावातील युवा नेते अतुल खुपसे यांना फोन करून हा प्रकार सांगितला. अतुल खुपसे यांनी दहिवलीचे उपसरपंच अमोल पाटील यांना बस अडविण्यास सांगितले. तोपर्यंत अतुल खुपसे हे सहका-यांसह दहिवली येथे पोहोचले.
दहिवली येथे कुर्डूवाडी आगारप्रमुखास संपर्क साधून घडलेला प्रकार सांगण्यात आला़ तरीही चालकाने आज नको, उद्यापासून एस़ टी़ उपळवटेत घेऊन येतो असे सांगत होते. मात्र राधाने तिचा आग्रह सोडला नाही, अखेर परत सहा किमी अंतर एस़ टी़ उपळवटे येथे नेण्यात आली़
राधाच्या धाडसाचे कौतुक, जल्लोष
राधा मोहन जगताप हिने केलेल्या धाडसामुळेच उपळवटे येथे एस़ टी़ सुरू झाली़ त्यामुळे तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे़ शिवाय गावात एस़ टी़ सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी जल्लोष केला.