प्रगत शैक्षणिक योजनेंतर्गत नववी, दहावीसाठी आता पायाभूत चाचणी!
By Admin | Updated: October 10, 2016 02:49 IST2016-10-10T02:49:05+5:302016-10-10T02:49:05+5:30
आठवी, नववी अभ्यासक्रमावर आधारित होणार पायाभूत चाचणी, अध्ययन पद्धतीत होणार बदल.

प्रगत शैक्षणिक योजनेंतर्गत नववी, दहावीसाठी आता पायाभूत चाचणी!
अकोला, दि. 0९- राज्य सरकारने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेंतर्गत प्राथमिक शाळांसोबतच आता माध्यमिक शाळांमध्येही पायाभूत चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पक्का करण्याच्या दृष्टिकोनातून आता पायाभूत चाचणी घेतली जाणार आहे. नववी व दहावीतील विद्यार्थ्यांची चाचणी ही आठवी आणि नववी अभ्यासक्रमावर आधारित राहणार आहे.
योजनेच्या अंमलबजावणीस अद्याप प्रारंभ झाला नसला, तरी प्राथमिक तयारी म्हणून माध्यमिक शिक्षण विभागाने तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली आहे. आधी शिक्षकांना प्रशिक्षण दिल्यानंतर आणि राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून आदेश आल्यानंतर माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी प्रगत शैक्षणिक योजनेंतर्गत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांच्या पायाभूत चाचण्या घेतल्या जाणार आहेत. राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व मंडळांशी संलग्न माध्यमिक शाळांसाठी ही योजना राहणार आहेत. माध्यमिक शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करणे, माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आणणे, गरजेनुसार विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम आखणे, प्रथम भाषा, गणित आणि विज्ञान या विषयांमधील विद्यार्थ्यांंची कामगिरी सुधारण्यासाठी लक्ष देणे तसेच माध्यमिक शिक्षणाच्या बाबतीत राष्ट्रीय पातळीवरील राज्याची कामगिरी सुधारणे यासाठी ही योजना माध्यमिक स्तरावरही राबविली जाणार आहे.
-तीन विषयांच्या अध्ययन पद्धतीत बदल
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजनेंतर्गत नववी व दहावीतील विद्यार्थ्यांना शिकविल्या जाणार्या इंग्रजी, गणित आणि विज्ञान विषयांच्या अध्ययन पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांंना हे तीन विषय अवघड जाऊ नये, यासाठी खेळीमेळीच्या वातावरणात हे विषय शिकविले जाणार असून, त्यासाठी पायाभूत चाचणी घेऊन विद्यार्थ्यांंची प्रगती तपासणी जाणार आहे. चाचणीमध्ये कमी गुण प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांंच्या प्रगतीत गती आणण्यासाठी विशेष भर दिला जाणार आहे.
-पाया मजबूत करण्यासाठी आठवी, नववीचा अभ्यासक्रम
विद्यार्थ्यांंचा पाया मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून नववीतील विद्यार्थ्यांंना आठवीचा अभ्यासक्रम आणि दहावीतील विद्यार्थ्यांंना नववीच्या अभ्यासक्रमावर आधारित पायाभूत चाचण्या घेतल्या जाणार आहेत. यासोबतच विद्यार्थ्यांंचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी विशेष प्रयोग करण्यात येणार आहेत.
मदर स्कूलचाही विचार
दर्जेदार आणि नामांकित शाळांच्या परिसरात असलेल्या आणि शैक्षणिकदृष्ट्या माघारलेल्या आणि कमकुवत शाळांमधील विद्यार्थ्यांंचा शैक्षणिक स्तर उंचाविण्यासाठी मदर स्कूलची योजना सुरू करण्याचा निर्णय लवकरच होणार आहे. या योजनेंतर्गत दर्जेदार शाळांकडे कमकुवत शाळांमधील विद्यार्थ्यांंची जबाबदारी देण्यात येणार आहे.
-कमकुवत विद्यार्थ्यांंची शैक्षणिक प्रगती व्हावी आणि विद्यार्थ्यांंंची गळती रोखावी, यासाठी नववी, दहावीसाठी पायाभूत चाचणी घेतली जाणार आहेत. त्यासाठी शिक्षण विभागाकडून तेल्हारा, बाळापूर आणि अकोल्यात कार्यशाळा घेण्यात आल्या. इंग्रजी, विज्ञान आणि गणित विषयांमध्ये विद्यार्थ्यांंची प्रगती व्हावी आणि शंभर टक्के निकाल लागवा, हा उद्देश पायाभूत चाचणीमागे आहे.
-गजानन चौधरी, प्रकल्प मार्गदर्शक
प्रगत शैक्षणिक योजना.