विनोद तावडे अडचणीत, १९१ कोटींच्या कंत्राटात आढळली अनियमितता
By Admin | Updated: June 30, 2015 12:06 IST2015-06-30T09:40:09+5:302015-06-30T12:06:37+5:30
राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या खात्यातील १९१ कोटी रुपयांच्या कंत्राटात अनियमतता आढळल्याने फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
विनोद तावडे अडचणीत, १९१ कोटींच्या कंत्राटात आढळली अनियमितता
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या चिक्की घोटाळ्यामुळे फडणवीस सरकारची कोंडी झाली असतानाच आता राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या खात्यातील १९१ कोटी रुपयांच्या कंत्राटात अनियमतता आढळली आहे. राज्याच्या अर्थखात्याने हा प्रकार लक्षात येताच तावडेंनी दिलेले कंत्राट रोखले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार विनोद तावडे यांच्या उच्च व तंत्रशिक्षण खात्याने फेब्रुवारीमध्ये तब्बल १९१ कोटी रुपयांचे कंत्राट काढले होते. यात प्रत्येक शाळेत अग्निरोधक यंत्र बसवले जाणार होते व हे काम ठाण्यातील कंपनीला देण्यात आले होते. यात प्रत्येक शाळेत तीन अग्निरोधक यंत्र बसवले जाणार होते. विशेष म्हणजे अर्थखात्याच्या परवानगीविनाच हे कंत्राट देण्यात आले.
मार्चमध्ये अर्थविभागातील वरिष्ठ अधिका-याने या कंत्राटप्रक्रियेवर आक्षेप घेतल्यानंतर हे कंत्राट रोखण्यात आले. १९ कोटींची तरतूद असताना १९१ कोटींचे कंत्राट दिले कसे असा सवालही अर्थखात्याने दिले आहे. ठाण्यातील ज्या कंपनीला हे कंत्राट दिले होते ती कंपनी सरकारच्या कंत्राटदारांच्या यादीतही नाही याकडेही अर्थखात्याने लक्ष वेधले आहे.
पंकजा मुंडेंनंतर आता विनोद तावडे यांच्या खात्यातील कंत्राट प्रक्रिया संशयाच्या भोव-यात आल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान विनोद तावडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहे. हा घोटाळा नसून आम्ही पूर्वीच्या सरकारने राबववेल्या प्रक्रियेचे पालन केले, मात्र अर्थखात्यातील वरिष्ठ अधिका-यांनी या प्रक्रियेतील त्रुटी निदर्शनास आणून दिल्याने आम्ही प्रक्रिया थांबवली, यात सरकारचा एकही पैसा खर्च झालेला नाही अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली आहे.