अनधिकृत लॅब जमवतात गल्ला
By Admin | Updated: April 13, 2015 05:45 IST2015-04-13T05:45:35+5:302015-04-13T05:45:35+5:30
सामान्य जनतेच्या खिशातून अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवाले वर्षाकाठी ८६४ कोटी रुपयांवर डल्ला मारत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे

अनधिकृत लॅब जमवतात गल्ला
पूजा दामले, मुंबई
सामान्य जनतेच्या खिशातून अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबवाले वर्षाकाठी ८६४ कोटी रुपयांवर डल्ला मारत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे रुग्णांची लूट तर होतेच; शिवाय या लॅबमधून मिळणाऱ्या रिपोर्टमुळे आरोग्यदेखील धोक्यात येते. आरोग्यासह राज्यातील नागरिकांची ही मोठी लूट असल्याचे महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलॉजिस्टचे म्हणणे आहे.
अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबमध्ये दिवसाला किमान २० रुग्णांची तसापणी होते. हे पाहता उपरोक्त आकडेवारी ही किमान आहे. राज्यात किमान ५ ते ६ हजार अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबचे जाळे पसरलेले आहे. अनधिकृत लॅबची संख्यादेखील किमान आहे. या अनधिकृत लॅब फक्त ग्रामीण भागांतच नाही, तर शहरी भागांतही मोठ्या प्रमाणात आहेत. डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नोलॉजी अथवा तत्सम शिक्षण घेतलेली व्यक्ती स्वतंत्ररीत्या पॅथॉलॉजी लॅब सुरू करू शकत नाही. तरीही कायद्याला बगल देत स्वतंत्रपणे या अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबचे जाळे निर्माण झाले आहे.
अनधिकृत लॅबमध्ये दिवसाला किमान २० रुग्णांची तपासणी गृहीत धरता प्रत्येक रुग्णाकडून किमान २०० रुपयांच्या तपासण्या केल्या जातात. वर्षाला ही उलाढाल किमान ८६४ कोटींच्या घरात जाते. प्रत्यक्षात ही उलाढाल यापेक्षाही अधिक असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप यादव यांनी सांगितले.
अशी होते फसवणूक...!
अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबमुळे रुग्णांची फसवणूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एखाद्या व्यक्तीला ताप आल्यावर त्यास तत्काळ या पॅथॉलॉजी लॅबमधून मलेरिया, टायफॉईडची तपासणी करून घ्यायला सांगितले जाते. टायफॉईड आहे की नाही हे पाहण्यासाठी ‘विडाल टेस्ट’ केली जाते. प्रत्यक्षात ताप आल्यानंतर आठ दिवसांनी विडाल टेस्ट करून घ्यायची असते. मात्र ताप आल्यानंतर तीन ते चार दिवसांतच विडाल टेस्ट करायला सांगितले जाते; आणि ती टेस्ट पॉझिटिव्हदेखील येते. अनधिकृत लॅबच्या विडाल रिपोर्टचा अभ्यास केल्यास टायफॉईड ही आरोग्य क्षेत्रातील मोठी समस्या असल्याचे जाहीर करावे लागेल, असे असोसिएशनचे म्हणणे आहे.