अनधिकृत झोपड्यांना सेनेचेही अभय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2016 05:54 IST2016-10-20T05:54:38+5:302016-10-20T05:54:38+5:30
निवडणुकीचे वेध लागलेल्या शिवसेनेनेही अखेर कोलांटी उडी घेत १४ फुटांवरील झोपड्यांना अभय देण्याची मागणी केली आहे.

अनधिकृत झोपड्यांना सेनेचेही अभय
मुंबई : निवडणुकीचे वेध लागलेल्या शिवसेनेनेही अखेर कोलांटी उडी घेत १४ फुटांवरील झोपड्यांना अभय देण्याची मागणी केली आहे. आपली ही सर्वात मोठी व्होट बँक वाचविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादीने यापूर्वीच गळा काढला होता. त्यामुळे अचानक शिवसेनेलाही मानवतेचा बुधवारी साक्षात्कार झाला. मात्र भाजपाने या मुद्दावरही मित्र पक्षाशी असहकार कायम ठेवल्याने शिवसेनेची गोची झाली आहे.
पावसाळ्यानंतर १४ फुटांवरील झोपड्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. मात्र फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक असल्याने याचे तीव्र पडसाद उमटले. परंतु वांद्रे येथील बेहराम पाड्यामध्ये चार मजली झोपडी पडून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्यूमुखी पडले. त्यामुळे १४ फुटांवरील झोपड्यांवर हातोडा मारण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सर्वात मोठी व्होट बँक दुखविणे राजकीय पक्षांना निवडणुकीत महागात पडणार आहे. परिणामी आतापर्यंत बेकायदा झोपड्याविरोधात आवाज काढणाऱ्या शिवसेनेनेही यू टर्न घेतला आहे. सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे १४ फुटांवरील एक मजली झोपड्यांना संरक्षण देण्याची मागणी स्थायी समितीच्या बैठकीत केली आहे. या झोपड्यांना नोटीस पाठविणे थांबवावे, अशी सुचनाही त्यांनी केली. मात्र अशी मागणी म्हणजे शहराशी गद्दारी असल्याची भूमिका मांडून भाजपाने शिवसेनेला हादरा दिला. (प्रतिनिधी)
विविध पक्षांचे मतदार विखुरले
मुंबईतील झोपड्यांमध्ये सुमारे ७० लाख लोकसंख्या आहे. यात दलित, मुस्लिम, उत्तर भारतीय व दक्षिण भारतीयांची संख्या अधिक आहे. या झोपड्यांमध्ये विविध पक्षांचे व्होट बँक विखुरले आहेत. त्यामुळे पालिकेच्या कारवाईचा फाटका या पक्षांच्या मतांना बसू शकतो.
फेररचनेमुळे आधीच मतदारांची विभागणी झाली असल्याने राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. त्यात या कारवाईमुळे त्यांची पाचावर धारण बसली आहे.