अनधिकृत बांधकामाची पालिकेकडून दखल नाही

By Admin | Updated: January 21, 2017 02:31 IST2017-01-21T02:31:26+5:302017-01-21T02:31:26+5:30

अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी मुंबई महापालिकेची हेल्पलाइन कार्यरत आहे

Unauthorized construction does not interfere with the corporation | अनधिकृत बांधकामाची पालिकेकडून दखल नाही

अनधिकृत बांधकामाची पालिकेकडून दखल नाही


मुंबई : अनधिकृत बांधकामांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी मुंबई महापालिकेची हेल्पलाइन कार्यरत आहे. पण पालिका अधिकाऱ्यांकडून या तक्रारींची कोणतीही दखल न घेता कशी निकाली काढण्यात येते, याचा अनुभव साकीनाका येथील मालन गिरी ही ७८ वर्षीय वृद्ध महिला घेत आहे.
अनधिकृत बांधकामांना थारा दिला जाणार नाही, अशी घोषणा आयुक्त अजय मेहता करीत असले तरी पालिकेच्या एल विभागाअंतर्गत अनेक अनधिकृत बांधकामे धडाक्याने होत आहेत. याचा तपशील अनिल गलगली यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळवला आहे. मालन गिरी या साकीनाका येथील मोहिली व्हिलेज येथील लक्ष्मीनारायण मंदिर मार्गावरील चाळीत राहतात. त्यांनी येथील जमीनमालक राजकुमार लोयलका यांच्याकडून १९८२ साली जमीन खरेदी केली. तेव्हापासून येथील काही जागा मोकळीच होती. मालन गिरी यांच्या ताब्यातील या मोकळ्या जागेत सल्लाउद्दिन या व्यक्तीने ११ डिसेंबर रोजी सरकारी सुटी असल्याचा फायदा घेत रात्रभरात अनधिकृत बांधकाम केले. त्याबाबत गिरी यांनी पोलीस नियंत्रण कक्ष व पालिकेच्या तक्रार निवारण कक्षात तक्रार दाखल केली. मात्र कोणत्याच यंत्रणेने त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही.
त्यामुळे १३ डिसेंबरपासून मालन गिरी यांनी महापालिका एल विभाग, आयुक्त, महापौर, सभागृह नेते तसेच उपनगर परिमंडळ ५चे उपायुक्त यांच्याकडेही तक्रारी केल्या. मनसे नगरसेवक दिलीप लांडे यांनीही दोन वेळा सहायक आयुक्त ललित कुमार अ‍ेबी यांना या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी केली. त्यांनी प्रभाग क्रमांक १५२मध्ये कार्यरत असलेले अभियंता योगेश तिवरेकर, मुकादम विश्वनाथ पवार यांना त्वरित कारवाई करण्यास सांगितले असता दोन दिवसांत नोटीस पाठवतो, असे सांगून हे अधिकारी महिनाभर गायब झाले. या महिनाभरात सलाउद्दिन याने बांधकाम पूर्ण केले. तरीही पालिका अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीच कारवाई केली नाही. याबाबत मालन गिरी यांनी मुख्यमंत्री तसेच महापालिका आयुक्तांना निवेदन सादर करीत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Unauthorized construction does not interfere with the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.