इस्लामपूरच्या अवलियाने जपलीय अॅम्बेसिडरची क्रेझ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2017 13:58 IST2017-06-19T13:58:38+5:302017-06-19T13:58:38+5:30
वाहन उद्योगात दररोज नवनव्या बनावटीच्या चारचाकी मॉडेल्सची भर पडत असताना येथील सत्तर वर्षीय मुसा शहाबुद्दीन आगा यांनी मात्र

इस्लामपूरच्या अवलियाने जपलीय अॅम्बेसिडरची क्रेझ
ऑनलाइन लोकमत,
इस्लामपूर (सांगली), दि. 19 - वाहन उद्योगात दररोज नवनव्या बनावटीच्या चारचाकी मॉडेल्सची भर पडत असताना येथील सत्तरवर्षीय मुसा शहाबुद्दीन आगा यांनी मात्र १९६६ मधील अॅम्बेसिडर मोटारीला जीवापाड जपले आहे. विशेष म्हणजे या मोटारीवरच त्यांचा चरितार्थ चालतो आहे. एकेकाळी रूबाबदार अॅम्बेसिडर मोटार आणि पांढऱ्या शुभ्र गणवेशातील चालक ही क्रेझ काही औरच असे. जवळपास सर्वच मंत्री-नेते आणि उच्चपदस्थ अधिकारी ही मोटार वापरत असत. कालांतराने विविध कंपन्यांच्या मोटारी बाजारत आल्या. कंपन्यांनी चारचाकींमध्ये आधुनिकता आणत बदल केले. त्यामुळे अॅम्बेसिडरची क्रेझ कमी होत गेली.
१९६५ ते १९८७ पर्यंत वाळवा तालुक्यातही अॅम्बेसिडरची जोरदार क्रेझ होती. राजारामबापू पाटील, एम. डी. पवार असे दिग्गज नेते अॅम्बेसिडरमधूनच जाताना दिसत. त्याच काळात येथील मणेर आणि आगा कुटुंबातील काही युवकांनी गांधी चौकाते २५ अॅम्बेसिडर मोटारींचा ताफा तैनात करुन त्या भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरु केला. त्यावेळी या मोटारीला मागणीही चांगली होती. मुसा आगा मात्र १९७२ मध्ये चालक म्हणून दुसऱ्याच्या अॅम्बेसिडरवर रूजू झाले. नंतर १९७६ मध्ये त्यांनी १९६६ ची जुनी अॅम्बेसिडर आठ हजार रुपयांना घेतली. त्यावेळी नव्या अॅम्बेसिडरची किंमत १६ हजार होती.
या मोटारीवर त्यांनी व्यवसाय सुरु केला. त्यावेळी डिझेलचा दर ९० पैसे लिटर, तर पेट्रोलचा दर १ रुपये २५ पैसे होता. इस्लामपुरातून सांगलीला स्पेशल भाडे ३० रुपये होते, तर पुण्याला जाऊन येण्यासाठी ४०० रुपये घेतले जात. त्या काळात पोलिसांना चिरीमिरी देण्याचा प्रकार नव्हता. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना फिरण्यासाठी म्हणून मोटार द्यावी लागे. सध्या पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. शिवाय इतर आलिशान मोटारींची रेलचेल वाढल्याने आता अॅम्बेसिडर मोटार भाड्याने नेण्यास कोणीच इच्छुक नसतात. मात्र आगा यांनी जनसंपर्काच्या जोरावर हा व्यवसाय आजही अॅम्बेसिडर मोटारीद्वारेच सुरु ठेवला आहे. येथील बसस्थानक परिसरात पहाटे सहालाच ते मोटारीसह तयार असतात. विशेष म्हणचे वयाच्या सत्तराव्या वर्षीही त्यांचा या व्यवसायातील उत्साह तरुणांनाही लाजवेल असा आहे.