माल उल्हासनगरचा, बिल अंबरनाथचे
By Admin | Updated: December 8, 2014 02:39 IST2014-12-08T02:39:49+5:302014-12-08T02:39:49+5:30
एलबीटी कर चुकविण्यासाठी बिल अंबरनाथचे तर माल उल्हासनगरचा असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी व्यापाऱ्यांना पाचपट दंड ठोठावण्यात आला आहे.

माल उल्हासनगरचा, बिल अंबरनाथचे
सदानंद नाईक, उल्हासनगर
एलबीटी कर चुकविण्यासाठी बिल अंबरनाथचे तर माल उल्हासनगरचा असल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी व्यापाऱ्यांना पाचपट दंड ठोठावण्यात आला आहे. व्यापाऱ्यांच्या लबाडीमुळे एलबीटीचे उत्पन्न अर्धावर आल्याचा आरोप करत शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी कारवाईची मागणी केली आहे.
महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर शनिवारी शहरातील स्वच्छतेची पाहणी करत होते. त्यावेळी कॅम्प क्रमांक-३, परिसरात एका ट्रक मधील माल दुकानात रिकामा केला जात होता. आयुक्तांना संशय आल्याने ट्रक चालकाकडे मालाचे बिल मागितले. तेव्हा चालकाची तारांबळ उडाली. मालाचे बिल अंबरनाथचे असताना तो उल्हासनगरात रिकामा करण्यात येत होता. त्यामुळे आयुक्तांनी दुकानदारावर पाचपट दंडाची कारवाई केली. कबुतर बिल व कच्च्या बिलाच्या चौकशीचे आदेश विभागाला दिले आहेत.
शहरातील व्यापाऱ्यांच्या व्यवहारांची २५ टक्केही अधिकृत नोंद होत नाही. त्यामुळे एलबीटीचा भरणा कसा करायचा, असा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. जकात प्रक्रीयेत खरेदी-विक्रीची नोंद ठेवणे बंधनकारक नव्हते. एलबीटी प्रक्रीया प्रणालीत खरेदी-विक्रीची नोंद ठेवून त्यानुसार एलबीटी भरण्याची पध्दत आहे.
शहरातील बहुतेक व्यापारी कबुतर व कच्च्या बिलाचा वापर करतात. खरेदी-विक्रीची अधिकृत नोंद ठेवत नाहीत. आता तर व्यापारी दुसऱ्या शहराच्या नावाने मालाचे बिल आणून माल शहरात रिकामा करू लागल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पालिका अधिकारी हैराण झाले आहेत. व्यापाऱ्यांच्या चालुगिरीपणाला आळा घालण्यासाठी धाडसत्र व जकात नाक्यावर मालाच्या गाड्यांची तपासणी करण्याची मागणी राज्य सरकारने केली आहे.