उल्हासनगरात ४२ हजार पाणी मीटर
By Admin | Updated: February 2, 2015 04:52 IST2015-02-02T04:52:03+5:302015-02-02T04:52:03+5:30
शहरात २७८ कोटींच्या पाणीवितरण योजने अंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे. पाणीपुरवठा समप्रमाणात होण्यासाठी ४२ हजार मीटर बसविण्यात येत आहेत

उल्हासनगरात ४२ हजार पाणी मीटर
उल्हासनगर : शहरात २७८ कोटींच्या पाणीवितरण योजने अंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे. पाणीपुरवठा समप्रमाणात होण्यासाठी ४२ हजार मीटर बसविण्यात येत आहेत. मात्र, आता चोरांनी या मीटरकडे मोर्चा वळविला आहे. हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन मीटरची चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगरात पाणीवितरण योजने अंतर्गत नवीन जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. याचबरोबर १३ जलकुंभ आणि पम्पिंग स्टेशन उभारली आहेत.
पाणीवितरण समप्रमाणात होण्यासाठी प्रत्येक नळजोडणीला मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे पाणी वापरण्यावर नियंत्रण ठेवता येणार असून, अपव्यय टाळणे शक्य होणार आहे.
पाणी मीटरमुळे पाणी वापरण्यावर निर्बंध येणार असल्याने काही नागरिक मीटर बसविण्यास विरोध करीत आहेत. नागरिकांच्या विरोधामुळे १२ हजार मीटर सहा महिन्यांपासून पडून आहेत. पाणीवितरण योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. निधीअभावी काम संथ गतीने सुरू आहे.
या वर्षात योजना पूर्णत: कार्यन्वित होऊन शहरवासीयांना मुबलक पाणी मिळणार आहे. तसेच ३८ टक्के पाणीगळती बंद होऊन लाखो लीटर पाण्याची बचत होणार आहे. (प्रतिनिधी)