उकाडा अन् भारनियमनाने पुणेकर झाले हैराण
By Admin | Updated: April 29, 2016 00:37 IST2016-04-29T00:37:59+5:302016-04-29T00:37:59+5:30
उन्हाचा वाढता कडाका, त्यात दिवसभर दुरुस्तीसाठी शहराच्या अर्ध्याहून अधिक भागाचा खंडित झालेला वीजपुरवठा यामुळे गुरुवारी पुणेकर हैराण झाले़

उकाडा अन् भारनियमनाने पुणेकर झाले हैराण
पुणे : उन्हाचा वाढता कडाका, त्यात दिवसभर दुरुस्तीसाठी शहराच्या अर्ध्याहून अधिक भागाचा खंडित झालेला वीजपुरवठा यामुळे गुरुवारी पुणेकर हैराण झाले़ गेले काही दिवस उन्हाचा कडाका वाढत असून, फॅनही नुसता गरगरत फिरत असतो़ त्यातून थंड वाऱ्याऐवजी गरम वारे असल्याचे जाणवावे, इतका उकाडा आहे़
शहरातील कमाल तापमान सध्या ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहत आहे़ त्यामुळे दुपारी उन्हात बाहेर पडण्याऐवजी घरात बसणे पुणेकर पसंत करताना दिसतात़ पण, गुरुवारी सकाळी ९ वाजल्यापासून शहरातील अनेक भागांत दुरुस्तीच्या कामानिमित्त महावितरणने वीजपुरवठा खंडित केला़ यामुळे घरात बसणेही अवघड होऊन गेले होते़ वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील अनेक सिग्नल दिवसभर बंद होते़ त्यामुळे सकाळच्या वेळी काही ठिकाणी वाहतूककोंडी होताना दिसत होती़ काही ठिकाणी सायंकाळी ४, तर काही ठिकाणी ५ वाजता वीजपुरवठा पूवर्वत सुरू झाला़ पण, सिग्नल सुरू करण्यासाठी पोलीस कर्मचारी नसल्याने अनेक चौकातील सिग्नल सुरू नव्हते़
कात्रजपासून धनकवडी, पद्मावती, पौड रोड, कोथरूड, डहाणूकर कॉलनी, डेक्कन परिसर, आपटे रोड, प्रभात रोड, रास्ता पेठ विभाग नगर रोड, खडकी, रहाटणी, भोसरीपर्यंतच्या भागातील वीजपुरवठा गुरूवारी खंडित होता़ या काळात महावितरणने नियमित दुरुस्ती, आॅईल फ्लिटरेशन, तारांची दुरुस्ती, झाडांच्या फांद्या तोडणे अशी कामे घेण्यात आली होती़