दीड शतकाकडे वाटचाल : शेतकरी आनंदी; ऊस, कांदा लागवडीला वेग
प्रभू पुजारी (पंढरपूर) : ‘२०-ट्वेंटी’ हा शब्दप्रयोग आता सर्वत्र परिचित झाला आहे़ हा क्रिकेटमधील शब्द असला तरी उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यातही गेल्या काही दिवसांपासून ‘२०-२०-ट्वेंटी’ सुरू असल्याचे दिसून येत आहे़. उजनीने आता नाबाद ‘सेंच्युरी’ केली असून दीड शतकाकडे वाटचाल सुरू आहे़ त्यामुळे शेतकरी आता आनंदी झाला असून ऊस व कांदा लागवडीला वेग आला आहे़
सोलापूर जिल्ह्यात अद्याप मुसळधार पाऊस झाला नाही़ त्यामुळे जिल्ह्यातील अनेक बंधारे, तलाव, विहिरी, बोअर कोरडे आहेत़ केवळ नीरेतून भीमा नदीत पाणी येत असल्याने ती तेवढी वाहू लागली आहे़ या पाण्यावर शेतकºयांची आणि शहरवासियांची तात्पुरती तहान भागेल, मात्र वर्षभर पुरेल असा पाणीसाठा होण्यासाठी मुसळधार पावसाचीच गरज आहे़ ही गरज परतीचा पाऊस पूर्ण करील, अशी सर्वांची अपेक्षा आहे़
सोलापूर जिल्ह्याला वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला ही आनंदाची बाब़ पुणे जिल्ह्यातील १९ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनीत बंडगार्डन व दौंड येथून मोठ्या प्रमाणात विसर्ग मिसळत होता़ त्यामुळेच क्रिकेटमधील ‘२०-२०-ट्वेंटी’ चा खेळ आणि ‘उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची स्थिती’ सारखीच वाटू लागली होती़ कारण केवळ ४० दिवसांत उजनीने ‘सेंच्युरी’ पार केली आहे़
आता तर अधिक ६२ टक्के झाले आहे़ विशेष म्हणजे उजनी धरणाने यंदा निच्चांकी पाणीपातळी गाठली होती़ धरण वजा ५३ टक्के झाले होते़ मायनसचा विळखा लवकर सुटणार नाही, असे वाटत होते़ मात्र उजनीच्या वरील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाला सुरवात झाली अन् ६ आॅगस्ट रोजी मायनसचा विळखा सुटून धरणाची वाटचाल प्लसकडे सुरू झाली़ १३ आॅगस्ट रोजी तर धरण अधिक ५० टक्के भरले़ म्हणजेच वजा ५३ आणि अधिक ५० असे करीत ‘सेंच्युरी’ पूर्ण केली़ आता दीड शतक (धरण १०० टक्के) केव्हा होतेय याचीच सर्वांनाच उत्सुकता आहे़
४० दिवसांत ‘सेंच्युरी’-------------
भारतात मान्सून जून, जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर असे ४ महिने असतो़ ४ महिने म्हणजेच १२० दिवस़ त्यातील केवळ ४० दिवसांत (तेही जुलै आणि आॅगस्टमधील) उजनीने सेंच्युरी पार केली़ आता दीड शतकाकडे वाटचाल सुरू आहे़ त्यामुळे यंदा उजनी ‘२०-ट्वेंटी’ ची ही मॅच जिंकून जिल्ह्यातील शेतकºयांना आनंदी करणार यात शंका नाही़