उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीची हॅटट्रिक
By Admin | Updated: August 29, 2016 05:00 IST2016-08-29T05:00:52+5:302016-08-29T05:00:52+5:30
स्पर्धा म्हटले की विक्रम, विश्वविक्रम आलेच. ठाणे महापौर मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने एका अनोख्या विक्रमाची नोंद या वर्षीही झाली.

उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीची हॅटट्रिक
पंकज रोडेकर , ठाणे
स्पर्धा म्हटले की विक्रम, विश्वविक्रम आलेच. ठाणे महापौर मॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने एका अनोख्या विक्रमाची नोंद या वर्षीही झाली. सलग तीन वर्षे निमंत्रण असूनही शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनुपस्थित राहण्याची हॅट्ट्रिक करत हा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. त्यामुळे उद्घाटन आणि पारितोषिक वितरण सोहळ्यावेळी हजर असलेले पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले.
मुंबईपाठोपाठ ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे पक्षातर्फे वारंवार सांगितले जाते. त्यामुळे येथील प्रमुख कार्यक्रमांना पक्षप्रमुखांना बोलवण्याचा, त्यांनी हजर राहण्याचा रिवाज आहे. महापालिकेच्या महापौर मॅरेथॉन स्पर्धेला तितकाच मान आहे. त्यासाठी राज्यातून स्पर्धक येतात. पालिका निवडणुकांमुळे यंदाच्या मॅरेथॉन स्पर्धेला राजकारणाचे कोंदण होते. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दहीहंडीच्या माध्यमामधून निवडणुकांचे रणशिंग फुंकले. राष्ट्रवादीने ३१ आॅॅगस्टच्या गडकरी रंगायतनातील मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे. शिवसेनेने मॅरेथॉनमध्ये अन्य पक्षांच्या नेत्यांना प्रवेशही दिला नाही.
त्यामुळेच उद्घाटनाला किंवा पारितोषिक वितरण सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनी यावे, यासाठी पक्षाने जोरदार तयारी केली होती. त्यातच, २६ वर्षांपासून सातत्याने मॅरेथॉन आयोजित करणारी ठाणे ही भारतातील एकमेव महापालिका म्हणून नोंदवली गेली. त्याच वेळी पक्षप्रमुखांनी सलग तिसऱ्यांदा अनुपस्थित राहून नवा विक्रम प्रस्थापित केला. मात्र, यामुळे निमंत्रितांमध्ये नाराजी आहे.
वाहतुकीचे तीनतेरा :मॅरेथॉनचे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवले होते. पण त्याची माहिती वाहनचालकांपर्यंत पोचली नाही. तसे फलकही लावलेले नव्हते. त्यामुळे कॅसल मिल येथे वाहतुकीचा मोठा गोंधळ पाहायला मिळाला. ही वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलीस हैराण झाले. मुले धावत आली की वाहतूक थांबविणे आणि पळत पुढे गेली की वाहने सोडणे असा खेळ सुरू होता.
चपला मागे, मुले गेली पुढे : १२ व १५ वर्षांखालील मुले पळायला लागली खरी, परंतु त्यांच्या चपला मागे राहिल्या आणि ते पुढे निघून गेले. थोडे पुढे गेल्यावर पुन्हा चपलांसाठी त्यांना धावत मागे यावे लागले. त्यामुळे पुढे जाता न आल्यामुळे अनेक स्पर्धकांचा चेहरा रडवेला झाला.
मुले हरवली, पालक सैरभैर
स्पर्धेत सहभागी झालेली १२ व १५ वर्षांखालील मुले सापडत नसल्याने पालक घाबरले होते आणि पालक सापडत नसल्यानेमुले धास्तावली होती. आयोजक सुरूवातीला याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पालकांचा संताप अनावर झाला आणि व्यासपीठावर येऊन त्यांनी याचा राग भलत्याच लोकांवर काढला. कोणाची बहिण, कोणचा भाऊ, कोणाची मुलगा-मुलगी मिळत नसल्याने नातलग रडकुंडीला आले होते. मुले मिळत नसल्याने पालक सैरभैर असतानाच आयोजक मात्र पारितोषिक वितरणाची लगीनघाई करीत होते. मुले हरविल्याचे संबंधितांनी त्यांच्या शिक्षकांना फोन करुन कळवल्यावर शिक्षकांनी तर कानावर हात ठेवले. ‘आम्ही घरी पोहोचलोय. तसे पालकांना कळवा,’ असा निरोप ते आयोजकांतर्फे केलेल्या फोनवर देत होते. मुलांसाठीचा स्पर्धेचा मार्ग शिक्षकांनी पालकांना न सांगितल्याचा हा परिणाम होता. पालक एकीकडे शोधत होते आणि मुले दुसरीकडे पोचली होती. त्यामुळे बराचकाळ पालक सैरभैर, मुले हरवलेली आणि ज्यांच्यावर जबाबदारी ते शाळेचे शिक्षक मात्र घरी असा अनुभव आयोजकांच्या वाट्याला आला. १५ वर्षांखालील मुलांची स्पर्धा कॅसल मिल येथे संपणार होती. याबाबत पालक अनभिज्ञ होते. महापालिकेने तसे शाळेला कळविले होते, पण शिक्षकांनी कोणतीही माहिती दिली नसल्याचे पालकांनी सांगितले. स्पधेच्या सांगतेचे ठिकाणच माहित नसल्याने पालकांनी महापालिकेजवळ गोंधळ घातला. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कॅसल मिलचे ठिकाण कळवल्यावर पालक तेथे धावत सुटले.