Uddhav Thackeray vs RSS Bhaiyyaji Joshi, Marathi in Mumbai: घाटकोपरची भाषा गुजराती असून मुंबईतील प्रत्येकाला मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे असं नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवकर संघाचे भैय्याजी जोशी यांनी नुकतेच केले. त्यांच्या या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी भैय्याजी जोशी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनाही आव्हान दिले.
भैय्याजी जोशींना 'चॅलेंज'
"ब्रह्मदेवाला आम्हीच जन्म दिला असा समज असणारे काही लोक सध्या वावरत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मुंबईत मराठी भाषा बोलता येणं गरजेचं नाही असं विधान केलं. हा संघाचा आणि भाजपाचा छुपा अजेंडा आहे. हे लोक आता मराठी - अमराठी, मराठा - मराठेतर असे विभाजन करून वाद निर्माण करू पाहत आहेत," असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. भैय्याजी जोशी यांचा उल्लेख अनाजी पंत असा करत ठाकरे म्हणाले, "मी आव्हान देतो की, अशी भाषा त्यांनी अहमदाबाद, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, बंगाल या ठिकाणी करून दाखवावी आणि तिथून सुखरूप परत येऊन दाखवावं. मराठी माणूस दयाशील आणि सहृदय आहे. मराठी लोक आम्हाला मतंच देणारच आहेत, असा विचार संघ-भाजपावले करतात आणि त्यामुळे ते मराठी माणसाला खिजगणतीत धरत नाहीत."
"राज्यांची जशी भाषावार प्रांतरचना केली गेली, तशी मुंबईची भाषावर गल्लीरचना करण्याचा घाट घातला जातोय. तोडा, फोडा आणि राज्य करा ही विकृत मानसिकता यानिमित्ताने सर्वांसमोर आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल सभागृहात म्हणाले की कोरटकर हा चिल्लर माणूस आहे, तसंच मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की भैय्याजी जोशी हा चिल्लर माणूस आहे," असे आव्हान ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले. "मविआचे सरकार असताना राज्यात मराठी भाषा सक्तीची करण्यात आली होती. त्यामुळे या भैय्याजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जावा. एकावर कायद्याचा बडगा उगारला की यापुढे इतर कोणाचीही बोलण्याची हिंमत होणार नाही," असेही ठाकरे म्हणाले.
मुंबई ही महानगरी आहे. ती जिंकायची असेल तर चांगली कामं करून जिंका. वाद आणि वाट लावून पळून जावू नका. पण मराठीवर कुणीही आघात करायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही कायम त्यांच्याविरोधात लढा देऊ.
भैय्याजी जोशी काय म्हणाले?
"मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. जसे की मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा गुजराती आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी सापडतील. तिथे तुम्हाला मराठी भाषा बोलणारे लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकलं पाहिजे असं काही नाही. " असं वक्तव्य जोशी यांनी केले.