दारु कंपन्यांना पाणीपुरवठा करण्यास उद्धव ठाकरेंचा विरोध
By Admin | Updated: April 16, 2016 15:28 IST2016-04-16T15:28:09+5:302016-04-16T15:28:09+5:30
मराठवाड्यातील दारु कंपन्यांना पाणीपुरवठा करण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोध केला आहे

दारु कंपन्यांना पाणीपुरवठा करण्यास उद्धव ठाकरेंचा विरोध
>ऑनलाइन लोकमत -
औरंगाबाद, दि. १६ - मराठवाड्यातील दारु कंपन्यांना पाणीपुरवठा करण्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोध केला आहे. 'मराठवाड्यात दारु कंपन्यांना दिलं जाणारं पाणी तात्काळ बंद करा. दुष्काळी परिस्थितीत दारुऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणं आवश्यक असल्याचं', उद्धव ठाकरे बोलले आहेत. औरंगाबादमध्ये शिवसेनेने आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी आपलं म्हणण मांडलं आहे.
एकीकडे उद्धव ठाकरेंनी दारु कंपन्यांना पाणीपुरवठा करण्यास विरोध केला असताना मित्रपक्ष भाजपच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अजब वक्तव्य केलं आहे. 'दारु किंवा उद्योगधंद्याना देण्यात येणारं पाणी हे आरक्षित केलेलं असतं. त्यामुळे अशा उद्योगांचं पाणी बंद करणं अयोग्य होईल. त्यांना जर पिण्याचं पाणी देण्यात येत असेल तर बंद करावं', असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. बीडमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षरित्या दारु कंपन्यांना पाणीपुरवठा करण्यास समर्थन केलं आहे.