स्टँड अप कॉमेडिअन कुणाल कामराच्या विडंबन गीतामुळे राज्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेशिवसेना आणि एकनाथ शिंदे शिवसेना वाद सुरु झाला आहे. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत कामरा चुकीचे काही बोलला नसल्याचे म्हणत त्याला पाठिंबा दिला आहे. तसेच अधिवेशनात देशाला उत्तम गाणे मिळाल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. यावर आता शिंदे गटाची जहरी प्रतिक्रिया आली आहे.
"अधिवेशनाने देशाला उत्तम गाणं दिलं मान्य करावं लागेल"; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
उद्धव ठाकरे हे आधुनिक जगातले औरंगजेब आहेत अशी गंभीर टीका शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. बाळासाहेबांना शेवटच्या दिवसांत त्यांनी किती त्रास दिला हे सगळ्यांना माहित आहे. राज ठाकरे त्याबाबत अनेकदा बोलले आहेत. औरंगजेबाने सत्तेसाठी आपल्या भावांचा काटा काढला. उध्दव ठाकरे यांनी वेगळे काय केले ? असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित केला.
तसेच ठाकरेंनी आपल्या सख्ख्या भावांना पद्धतशीरपणे दूर केले. बाळासाहेबांची वैचारिक संपत्ती त्यांनी सोडली. पण इतर प्रॉपर्टीसाठी भावासोबत दावा मांडला. हा दावा कोर्टात गेला. बाळासाहेबांना अखेरच्या दिवसांत त्यांनी त्रास दिलाच, पण त्यांच्या निधनानंतर शिवसेनेच्या दुष्मनांशी हातमिळवणी करून आताही यातना देत आहेत. जे भावाचे नाही झाले, ते जनतेचे काय होणार? असा टोला म्हस्के यांनी लगावला.
उद्धव ठाकरे काय म्हणालेले..."जयंत पाटील यांनी काल म्हटले की या अधिवेशनाचे फलित काय? या अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं यापेक्षा अधिवेशन काळाने संपूर्ण देशाला उत्तम गाणे दिले हे आपल्याला मान्य करावे लागेल. हे गाणे आज देशातल्या कानाकोपऱ्यात आणि प्रत्येकाच्या मनात गुणगुणले जातंय. हे अधिवेशन म्हणजे कबरीपासून कामरापर्यंत नेणारे होते बाकी काहीच नाही. असे अधिवेशन का घेतले आणि त्यातून आपण काय दिले असा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.