Shiv Sena Uddhav Thackeray Group: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूनक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत आल्याने देशाच्या राजधानीत आणि महाराष्ट्रात चर्चांना उधाण आले होते. दोन्ही नेते दिल्लीत तीन दिवस तळ ठोकून बसणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाला उपस्थिती लावली. परंतु, यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांना शेवटच्या रांगेत बसवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यातच उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असताना इथे महाराष्ट्रात ठाकरे गटात आलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
एकीकडे उद्धव ठाकरे गटाला राज्यभरातून खिंडार पडत असल्याचे दिसत आहे. पक्षाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. यातच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटात नवचैतन्य आल्याचे पाहायला मिळत आहे. असे असले तरी ठाकरे गटाला लागलेली गळती आणि पक्षांतर्गत वाढत चाललेली नाराजी कमी होताना दिसत नाही. एकामागून एक पदाधिकारी, नेते, माजी नगरसेवक, कार्यकर्ते महायुतीत सामील होत आहेत. यातच उद्धवसेनेत बाहेरच्यांची लुडबुड होत असल्याचा दावा पक्षातीलच काही जण करत असल्याचे म्हटले जात आहे.
... म्हणे, उद्धवसेनेत बाहेरच्यांची लुडबुड
उद्धवसेनेने पक्षाची नवी मुंबई कार्यकारिणी घोषित केल्यानंतर पक्षाचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसैनिक बुचकळ्यात पडले. पडत्या काळात ज्या नेत्याने नवी मुंबईत उद्धवसेनेचे अस्तित्व टिकवून ठेवले, त्याला न विचारताच राजन विचारे यांच्या सांगण्यावरून पक्षश्रेष्ठींनी नवी मुंबई कार्यकारिणी घोषित केल्याने राजीनामा देत असल्याचे नाराज मोरेंनी म्हटले आहे. या घडामोडीत उद्धवसेनेचे नेते सुभाष देसाई, रवींद्र मिर्लेकर यांनाही नवे पदाधिकारी नेमताना अंधारात ठेवल्याचे कारण मोरेंच्या राजीनाम्यात दडल्याचे सांगण्यात येते. पण, वास्तव अद्याप गुलदस्त्यातच आहे, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, इंडिया आघाडी विखुरलेली दिसत आहे. आप बाहेर पडली आहे. ममता बॅनर्जींची वेगळी भूमिका आहे. महाराष्ट्रातील राजकारण बदल आहे. दोन बंधू एकत्र येत असताना शिवसेना (यूबीटी) इंडिया आघाडीत राहणार का?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. ते म्हणाले, "अशा काही अटी-शर्ती नाहीयेत. मी म्हटलं आहे की आम्हा दोघांचा निर्णय घ्यायला आम्ही दोघंही खंबीर आहोत."