लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या हातात आता काहीही राहिले नाही, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विस्तव टाकण्याचा बालिशपणा ते करत आहेत. फडणवीस आणि शिंदे यांची दोस्ती पक्की आहे. ज्यांनी अधिवेशनात कामकाजात सहभाग घेतला नाही, चर्चा केली नाही त्यांनी फडणवीस, शिंदे यांना सभागृहाच्या कामकाजाची आठवण करून देण्याची गरज नाही, असा पलटवार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी ठाकरे यांच्यावर केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौगात ए मोदी या निर्णयाचे आम्ही स्वागत केले आहे. राष्ट्रभक्त मुस्लिमांचे समर्थन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे करत होते. तेच विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. परंतु, निवडणुकीत फेक नॅरेटिव्ह तयार करून मिळविलेली मुस्लिमांची मते हातातून जातील की काय याची भीती वाटत असल्यामुळेच ते भाजप आणि शिंदेसेनेवर टीका करत आहेत. महायुतीच्या वचनानाम्यातील आश्वासने ५ वर्षांत पूर्ण केली जातील, असे सामंत म्हणाले.
संसदीय आयुधांच्या माध्यमातून चर्चा करा
काहीजण विधानभवनात येऊन पत्रकार परिषद घेतात, पण त्यांनी आधी कामकाज समजून घेणे गरजेचे आहे. सभागृहात तासन्तास बसले पाहिजे. विधिमंडळाच्या लाल, हिरव्या पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे. संसदीय आयुधांच्या माध्यमातून जनतेसाठी चर्चा केली पाहिजे. विधिमंडळात येऊन पत्रकार परिषदेत चर्चा केली म्हणजे विधिमंडळात चर्चा केली हे जनता ग्राह्य मानत नाही हे काहींनी समजून घेतले पाहिजे, अशी टीकाही सामंत यांनी केली.