Uddhan Thackeray Eknath Shinde: विधान परिषदेमध्ये मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आक्रमक झाल्याचे दिसले. सभागृहात बोलत असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती आणि त्यांची माफी मागितली होती, असा दावा केला. त्यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे त्यावेळी पंतप्रधान मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात होते, असे म्हणत डिवचले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
एकनाथ शिंदे विधान परिषदेत बोलत होते. त्यावेळी अनिल परबांना उद्देशून त्यांनी उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितल्याचा दावा केला.
"ठाकरे मोदींना म्हणाले माफ करा"
"यांचे प्रमुख पण मोदींना जाऊन भेटले. मला माफ करा म्हणाले. आम्ही पुन्हा सोबत येतो म्हणाले. इकडे येऊन पलटी मारली. तुम्ही (अनिल परब) पण गेले होते. तुम्हाला जेव्हा नोटीस आली, तेव्हा तुम्ही गेले होते. तुम्ही म्हणाले मला यातून सोडवा. नंतर सुटल्यावर तुम्ही पलटी मारली. ही गोष्ट मला माहिती आहे", असा एकनाथ शिंदे दावा उपमुख्यमंत्री शिंदेंनी विधान परिषदेत बोलताना केला.
मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात असतील -ठाकरे
एकनाथ शिंदेंनी केलेल्या दाव्याबद्दल माध्यमांनी ठाकरेंना प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, "तेव्हा एकनाथ शिंदे हे मोदींच्या कचऱ्याच्या डब्यात होते. आम्हाला कळलंच नाही", अशा शब्दात ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं.
आता गटप्रमुखांनाही फोन करतात, मी ऑपरेशन केलंय -शिंदे
उद्धव ठाकरेंच्या या खोचक टीकेला शिंदेंनी उत्तर दिले. ते म्हणाले, "आता त्यांच्याबद्दल मी काय बोलणार? त्यांच्याकडचे सगळे माणसं रोज येताहेत. आता डस्टबीन त्यांच्या घरातील रिकामी राहील. याचा विचार त्यांनी करावा. ते म्हणतात की, गेला तो गद्दार. गेला तो कचरा. त्यांनी आत्मचिंतन, आत्म परिक्षण केलं पाहिजे. पूर्वी आमदारांना, खासदारांना, मंत्र्यांना भेटत नव्हते. आता गटप्रमुखांनाही फोन करतात. सुधारणा झालेली आहे. मी डॉक्टर नसलो, तरी ऑपरेशन केलेलं आहे. माझा मुलगा डॉक्टर आहे. पण, मी ऑपरेशन केलं", असा पलटवार शिंदेंनी ठाकरेंवर केला.