उद्धव-राज एकत्र?
By Admin | Updated: September 27, 2014 05:45 IST2014-09-27T05:45:49+5:302014-09-27T05:45:49+5:30
भाजपाने शिवसेनेबरोबरची आपली युती तोडल्याने आता उद्धव ठाकरे व राज ठाकरे बंधु एकत्र येऊन शिवसेना-मनसे युती करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आज दिवसभर होती

उद्धव-राज एकत्र?
मुंबई : भाजपाने शिवसेनेबरोबरची आपली युती तोडल्याने आता उद्धव ठाकरे व राज ठाकरे बंधु एकत्र येऊन शिवसेना-मनसे युती करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा आज दिवसभर होती. शिवसेनेने या शक्यतेचा इन्कार केला असला, तरी मनसेने मात्र सूचक मौन बाळगले आहे.
राज ठाकरे गेले काही दिवस तापाने आजारी होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्याकरिता उद्धव यांनी दोन दिवसांपूर्वी दूरध्वनी केला होता, असे समजते. त्यानंतर गुरुवारी भाजपाने युती तोडल्यानंतर शिवसेना व मनसेच्या नेत्यांची मध्यरात्री
सुरु झालेली बैठक पहाटेपर्यंत सुरु होती, असे कळते.
लोकसभा निकालानंतर शिवसेनेच्या निकटवर्तीय वर्तुळात वावर असलेल्या भय्यू महाराज यांनी उद्धव व राज यांची भेट घेऊन दोघांनी एकत्र यावे, असा प्रयत्न केला होता.
माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेच्या नितीन सरदेसाई यांनी आपला अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या सदा सरवणकर यांनी अर्ज दाखल केला असला तरी त्यांना पक्षाने एबी फॉर्म दिला नसल्याचे कळते. याच न्यायाने शिवसेनेकडील विलेपार्ले मतदारसंघात मनसेच्या उमेदवाराला पक्षाने एबी फॉर्म दिला नसल्याचे सांगण्यात आले. मराठवाडा व विदर्भातील उमेदवारांचे एबी फॉर्म मनसेने रोखून धरल्याची चर्चा आहे. शिवसेनेने मुंबईतील सर्व उमेदवारांना एबी फॉर्म दिलेले नाहीत, असे कळते.