उद्धव पुढे न आल्याने युती झाली नाही - राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
By Admin | Updated: October 9, 2014 13:48 IST2014-10-09T12:02:01+5:302014-10-09T13:48:31+5:30
शिवसेनेसोबत एकत्र येण्याबाबत मी प्रयत्न केले होते मात्र उद्धवकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने युती होऊ शकली नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

उद्धव पुढे न आल्याने युती झाली नाही - राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ९ - शिवसेना - भाजप युती तुटल्यावर शिवसेनेसोबत एकत्र येण्याबद्दल उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा झाली होती, मात्र त्यानंतर शिवसेना नेत्यांनी आमच्याशी संपर्कच न साधल्याने ही युती होऊ शकली नाही असा गौप्यस्फोट मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी केला आहे. त्यांच्या पोनची वाट पाहत आम्ही एबी फॉर्म वाटणेही थांबवले होते, मात्र शिवसेना नेत्यांनी प्रतिसाद न दिल्याने अखेरीस दुस-या दिवशी संध्याकाळी चार वाजता आमच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटले असे त्यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे - राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात याविषयी भाष्य केले आहे. 'युती तुटली त्यादिवशी माझी उद्धवसोबत फोनवरून चर्चा झाली होती. आपण चर्चा
करावी, सभांमध्ये एकमेकांवर टीका करायची नाही आणि बाकीेचे निवडणुकीनंतर बघू असे तीन मुद्दे त्यांनी माझ्याकडे मांडले. यावर मी सहमती दर्शवली होती' असे राज ठाकरेंनी सांगितले. मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई तर शिवसेनेकडून अनिल देसाई व अन्य एक नेता यांच्यात चर्चा होणार असेही आमच्यात ठरले होते. त्याप्रमाणे बाळा नांदगावकरांनी अनेक वेळा अनिल देसाईंना फोन करून भेटण्याविषयी विचारले. मात्र व्यस्त असल्याचे सांगत ते भेटण्याची वेळ पुढे-पुढे सरकवत राहिले. दुपारपर्यंत आम्ही शिवसेनेच्या प्रतिसादाची वाट बघितली, मात्र तरीही त्यांच्याकडून कोणताही फोन न आल्याने आम्ही आमच्या उमेदवारांना एबी फॉर्म देऊन टाकले असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले.