बाळासाहेब स्मारक ट्रस्टवर उद्धव,आदित्य

By Admin | Updated: September 27, 2016 02:27 IST2016-09-27T02:27:31+5:302016-09-27T02:27:31+5:30

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या महापौर बंगल्यातील स्मारकाच्या ट्रस्टवर वर्णी लागावी यासाठी शिवसेना नेत्यांमध्ये सुरू असलेली चुरस अखेर सोमवारी संपली. प्रस्तावित

Uddhav, Aditya on Balasaheb Memorial Trust | बाळासाहेब स्मारक ट्रस्टवर उद्धव,आदित्य

बाळासाहेब स्मारक ट्रस्टवर उद्धव,आदित्य

मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या महापौर बंगल्यातील स्मारकाच्या ट्रस्टवर वर्णी लागावी यासाठी शिवसेना नेत्यांमध्ये सुरू असलेली चुरस अखेर सोमवारी संपली. प्रस्तावित ट्रस्टसाठी शिवसेनेने चार नावांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविली आहे. यात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ सेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि वास्तुविशारद शशी प्रभू यांचा समावेश करण्यात आला आहे.
दादर येथील महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक उभारण्याचे निश्चित झाल्यानंतरही स्मारक ट्रस्टच्या नोंदणीचे काम रखडले होते. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या जोडीला ट्रस्टमध्ये कोणत्या नेत्याची वर्णी लावायची यावरून पेच निर्माण झाला होता. सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, एकनाथ शिंदे आदी नेत्यांच्या नावाची चर्चा होती. सोमवारी, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे नावांची यादी पाठवत या चर्चेला पूर्णविराम दिला.
सुभाष देसाई यांनी ट्रस्टींच्या नावाला दुजोरा दिला आहे. महापौर बंगल्यात उभारण्यात येणाऱ्या या स्मारकाच्या प्रस्तावित ट्रस्टमध्ये ११ जणांचा समावेश असणार आहे. उद्धव ठाकरे या ट्रस्टचे आजीव सदस्य व अध्यक्ष असतील. आदित्य ठाकरे यांच्याकडेही आजीव सदस्यत्व असणार आहे. याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री या ट्रस्टवर असतील.
शिवसेनेकडून ट्रस्टवरील सदस्यांची नावे पाठविण्यात आल्यानंतर लवकरच धर्मादाय आयुक्तांकडे ट्रस्टची नोंदणी करण्याचे काम सरकारकडून हाती घेण्यात येईल. ट्रस्टच्या नोंदणीनंतर स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळणार आहे. ऐतिहासिक वास्तू असणाऱ्या महापौर बंगल्यासह शेजारील क्लबची जागाही स्मारकासाठी घेण्यात येणार आहे. क्लबच्या जागेवर बाळासाहेबांशी संबंधित शिल्प ठेवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. महापालिकेने यापूर्वीच क्लबला जागा रिकामी करण्याची नोटीस बजावली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Uddhav, Aditya on Balasaheb Memorial Trust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.