दोन महिला शिपायांसह तीन पोलिसांनी घडविले हत्याकांड!
By Admin | Updated: May 30, 2015 09:07 IST2015-05-30T02:08:26+5:302015-05-30T09:07:05+5:30
अकोल्यातील युवकाचे हिंगोलीतील खून प्रकरण.

दोन महिला शिपायांसह तीन पोलिसांनी घडविले हत्याकांड!
अकोला : गत काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अकोल्यातील एका युवकाच्या खूनप्रकरणी शुक्रवारी खळबळजनक माहिती समोर आली. तीन पोलिसांसह पाच जणांनी हे हत्याकांड घडविल्याची माहिती समोर येत असून, यात वाशिम जिल्ह्यातील दोन महिला पोलिसांवरही संशयाची सुई फिरत आहे. तिसरा पोलीस हा एका महिला पोलिसाचा पती आहे. याप्रकरणी एका महिला पोलिस शिपायास अटक करण्यात आली असून, हिंगोली येथील न्यायालयाने तिला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अकोल्यातील गंगा नगरात राहणार्या रवी डोईफोडे नामक युवकाचे खून प्रकरण २७ मे रोजी हिंगोली येथे उघडकीस आले होते. मृताच्या नातेवाईकांनी वाशिम येथील पोलीस कर्मचारी उषा मुंढे हिच्यावर संशय व्यक्त केल्याने हिंगोली पोलिसांनी तिला गुरुवारी ताब्यात घेतले. चौघांच्या मदतीने रवीची हत्या केल्याचे तिने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले. रवीचा मृतदेह २७ मे रोजी हिंगोली शहरातील एका विहीरीमध्ये कुजलेल्या स्थितीमध्ये आढळला होता. त्यामुळे त्याची हत्या हिंगोलीतच केली असावी, अशी आजवर चर्चा होती. प्रत्यक्षात हे हत्याकांड २४ मे रोजी वाशिम येथील आययुडीपी कॉलनीमध्ये करण्यात आले होते. त्याची हत्या करण्यासाठी उषा मुंढे हीने वाशिम येथील शहर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या तिचा पती पोलिस शिपाई, आणखी एक महिला पोलिस शिपाई आणि हिंगोली येथील दोन इसमांची मदत घेतली. रवीचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह वाशिम येथून कारने हिंगोली शहरामध्ये नेण्यात आला. हिंगोली शहरातील लाला लजपतराय नगरातील एका विहीरीमध्ये त्याचा मृतदेह टाकल्याची माहिती या प्रकरणाचा तपास करणार्या हिंगोली पोलिसांना शुक्रवारी मिळाली. हिंगोली पोलिसांनी उषा मुंढे या महिला पोलिसास अटक करून शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता, तिला सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.अनैतिक संबंधातून हे हत्याकांड घडले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, त्यादिशेने तपास सुरू आहे.
याप्रकरणातील उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी हिंगोली पोलीस दोन दिवसांपासून वाशिम शहरामध्ये ठाण मांडून आहेत.