स्वाईन फ्लूने दोन महिलांचा मृत्यू
By Admin | Updated: February 8, 2015 01:18 IST2015-02-08T01:18:12+5:302015-02-08T01:18:12+5:30
स्वाईन फ्लूच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) उपचार घेत असलेल्या एका बाळंतीणीसह आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

स्वाईन फ्लूने दोन महिलांचा मृत्यू
३७ दिवसांत १७ बळी : रुग्णांची संख्या ५०
नागपूर : स्वाईन फ्लूच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) उपचार घेत असलेल्या एका बाळंतीणीसह आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. गेल्या ३७ दिवसांत बळीची संख्या १७ झाली आहे. शनिवारी पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या ३७ दिवसांत ५० रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
मृत बाळंतणीचे नाव सादिका शेख (२०) असून, ती काटोल रोड जगदीशनगर येथील रहिवासी आहे. तर दुसऱ्या मृताचे नाव शशिकला केशव बावणे (३६) आहे. ती कोतवाली येथील राहणारी आहे.
सादिका शेख हिच्या नऊ-दहा दिवसांच्या बाळाला वाचविण्यास मेयो प्रशासनाला यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सादिका २७ जानेवारी रोजी प्रसूतीसाठी मेयो रुग्णालयात भरती झाली. स्वाईन फ्लूची लक्षणे तिच्यात दिसून आल्याने नऊ दिवसांपूर्वी झालेल्या बाळाला तिच्यापासून दूर ठेवण्यात आले. ४ फेब्रुवारी पहाटे ५.३० वाजता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. शशिकला बावणे हिचा मृत्यू ६ फेब्रुवारीला मेयोत उपचार सुरू असताना झाला.
आज मेडिकलकडून तपासणीसाठी ११ संशयित रुग्णांचे नमुने मेयोत पाठविण्यात आले होते. यात दोन पुरुष तर तीन महिला पॉझिटिव्ह आल्या आहेत. यातील एक हिंगणा येथील ५६ वर्षीय महिला लता मंगेशकर इस्पितळात उपचार घेत आहे, तर ३५ व ३२ वर्षीय पुरुष व ५०, ५६, ६० वर्षीय तीन महिला मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात उपचार घेत आहेत. हे चारही रुग्ण नागपुरातील आहेत. स्वाईन फ्लू वॉर्डात सद्यस्थितीत २२ रुग्ण उपचार घेत आहेत. (प्रतिनिधी)