ऑनलाइन लोकमतउस्मानाबाद, दि. 17 - राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल अॅग्रो या कंपनीच्या वतीने लोहारा शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावर साखर कारखाना सुरू केला आहे. या कारखान्यासाठी शेतकऱ्यांना कसल्याही स्वरूपाची माहिती न देता कंपनीने लोहाऱ्यासह परिसरातील सुमारे दोन हजार शेतकऱ्यांच्या नावे थोडेथोडके नव्हे, तर २० कोटी रूपयांचे कर्ज ‘इको’ या बँकेकडून उचलले होते. काही शेतकऱ्यांना बँकेकडून नोटिसा आल्यानंंतर या प्रकाराचा भांडाफोड झाला. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर ‘लोकमंगल’ने या रकमेची परतफेड केली आहे. ‘लोकमंगल’ समुहाचा सोलापूरसह उस्मानाबाद जिल्ह्यातही विविध क्षेत्रात मोठा दबदबा आहे. राज्याचे सहकामंत्री असलेले सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल अॅग्रो या कंपनीने साखर कारखाना उभारण्यासाठी तब्बल ४ हजार ७५१ गुंतवणूकदारांकडून ७४.८२ कोटी रूपये ‘सेबी’च्या नियमांकडे कानाडोळा करून जमविल्याचा ठपका ठेवत सदरील रक्कम शेतकऱ्यांना व्याजासह परत करण्याबाबतचे आदेश काढले आहेत. ‘लोकमंगल’कडून ही रक्कम २००९ ते २०१५ या कालावधीत वसूल करण्यात आली होती. ‘लोकमंगल’च्या या कारभाराचे चटके लोहाऱ्यासह परिसरातील एक -दोन नव्हे, तर हजारो शेतकऱ्यांना सोसावे लागले आहेत. लोहारा तालुक्यातील खेड येथे लोकमंगल अॅग्रो या कंपनीच्या वतीने ‘लोकमंगल माऊली शुगर इंडस्ट्रीज’ या नावाने कारखाना सुरू करण्यात आला आहे. सदरील कारखाना उभारणीसाठी सुमारे दोन हजार शेतकऱ्यांच्या नावे ‘इको’ बँकेकडून कर्ज घेण्यात आले. विशेष म्हणजे सदरील कर्जप्रकरणे करताना शेतकऱ्यांना साधी कल्पनाही दिली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या डोक्यावर कर्ज आहे, याची पुसटशीही कल्पना नव्हती. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी दोन हजार शेतकऱ्यांपैकी काहीजणांना ‘इको’ बँकेकडून कर्जाचा भरणा करण्यासंदर्भात नोटीसा पाठविण्यात आल्या. त्यामुळे कसलेही कर्ज न घेता थेट वसुलीच्या नोटीसाच हातात पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यामुळे धास्तावलेल्या काही शेतकऱ्यांनी थेट ‘इको’ बँक गाठून संबंधित अधिकाऱ्यांकडे या कर्जाबाबत विचारणा केली. त्यानंतर हा सर्व गोंधळ समोर आला. त्यावर शेतकऱ्यांनी याबाबत ‘लोकमंगल’कडे तक्रारी केल्या. तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर ‘लोकमंगल’कडून उपरोक्त कर्ज रकमेची परतफेड करण्यात आल्याचे बँकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, रकमेची परफेड झाली असली तरी संबंधित शेतकऱ्यांना मागील पाच ते सहा महिने प्रचंड मानसिक आणि अर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले.
दोन हजार शेतकऱ्यांच्या नावे उचलले होते २० कोटींचे कर्ज
By admin | Updated: August 17, 2016 21:23 IST