'जय' वाघाच्या हत्येच्या संशयावरून दोघे संशयित ताब्यात
By Admin | Updated: August 16, 2016 21:28 IST2016-08-16T21:18:25+5:302016-08-16T21:28:49+5:30
आशिया खंडातील आकाराने दुसऱ्या क्रमांकाचा वाघांपैकी 'जय' नामक वाघाच्या हत्येच्या संशयावरुन भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

'जय' वाघाच्या हत्येच्या संशयावरून दोघे संशयित ताब्यात
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १६ - आशिया खंडातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाच्या वाघांपैकी एक असलेल्या 'जय' नामक गायब असलेल्या वाघाच्या हत्येच्या संशयावरून भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पवनी तालुक्यातील कोदुर्ली गावातील किसन इस्तारी समर्थ व मधुकर हटवार यांना 'जय' वाघाच्या हत्येच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले असून, त्या दोघांची वनविभागाच्या अधिका-यांनी दिवसभर चौकशी केली. यावेळी या दोघांच्या घरामध्ये प्राणी शिकारीसाठी वापरण्यात येणारे तारेचे फासे सापडले. तसेच वनविभागाच्या कॅमे-यामध्ये त्यांचे फोटो अस्पष्टपणे दिसत असल्याची चर्चा आहे.
पाहताक्षणीच पर्यटकांना भुरळ घालणारा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील ‘जय’ हा वाघ अचानक गायब झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यामुळे संपूर्ण वनविभाग अस्वस्थ झाला आहे. विशेष म्हणजे, हा वाघ मागील काही वर्षांपासून या अभयारण्याची खास ओळख बनला होता. जंगलात ‘जय’चे दर्शन होताच पर्यटकही समाधान व्यक्त करीत होते. तो अल्पावधीतच राज्यभरात प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे त्याचे दर्शन घेण्यासाठी पर्यटकांच्या या अभयारण्यात रांगा लागत होत्या. एवढेच नव्हे, तर मुंबई-पुण्यावरून व्हीव्हीआयपीसुद्धा त्याला पाहण्यासाठी येथे येत होते. अशा प्रकारे ‘जय’ हा मागील तीन वर्षांत वाघांमधील ‘हिरो’ झाला होता. यातूनच वनविभागासमोर त्याच्या सुरक्षेचे एक आव्हान उभे ठाकले होते. त्यामुळे ‘जय’वर २४ तास नजर ठेवता यावी यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयाने १५ सप्टेंबर २०१५ रोजी लाखो रुपये खर्च करून वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या मदतीने ‘जय’ला रेडिओ कॉलर लावली. मात्र दोनच महिन्यांत म्हणजे, २५ नोव्हेंबर २०१५ रोजी ती रेडिओ कॉलर बंद पडली.
यानंतर १८ मार्च २०१६ रोजी त्याला पुन्हा दुसरी नवीन रेडिओ कॉलर लावण्यात आली. परंतु अवघ्या महिनाभरात तीसुद्धा बंद पडली. आणि आश्चर्याची बाब म्हणजे, तो याच काळापासून अचानक गायब झाला. काही जाणकारांच्या मते, ८ मे २०१६ रोजी तो ब्रह्मपुरी येथील जंगलात आढळून आला. परंतु त्यानंतर तो कुणालाही दिसला नाही.
वनविभाग त्याचा कसून शोध घेत आहे. त्याचवेळी वन विभागातील काही अधिकारी उमरेड-कऱ्हांडला या जंगलात वाघांची (नर) संख्या वाढल्याने ‘जय’ने आपल्या नवीन अधिवासाच्या शोधात हे जंगल सोडल्याचा अंदाज व्यक्त करीत आहेत. परंतु त्याच वेळी काही जाणकार ‘जय’ हा एवढ्या सहजासहजी आपले जंगल सोडून दुसरीकडे जाणारा प्राणी नाही, असा दावा करीत आहे. त्यामुळे ‘जय’सोबत काही घातपात तर झाला नाही ना! अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ‘जय’च्या घातपातच्या संशयावरून वनविभागाच्या अधिका-यांनी किसन इस्तारी समर्थ व मधुकर हटवार यांना ताब्यात घेतले आहे.