पुण्यात प्रेमसंबंधातून दोघांची आत्महत्या

By Admin | Updated: May 7, 2017 03:03 IST2017-05-07T03:03:51+5:302017-05-07T03:03:51+5:30

दिघी, आदर्शनगर येथे विवाहितेसह तिच्या ओळखीतील एकाने हाताच्या नसा कापून तसेच शरीरावर चाकूचे वार करून जीवनयात्रा

Two suicides in love in Pune | पुण्यात प्रेमसंबंधातून दोघांची आत्महत्या

पुण्यात प्रेमसंबंधातून दोघांची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी (पुणे) : दिघी, आदर्शनगर येथे विवाहितेसह तिच्या ओळखीतील एकाने हाताच्या नसा कापून तसेच शरीरावर चाकूचे वार करून जीवनयात्रा संपवली. ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. सपना सुरेश भले (२५, मूळ गाव हडसर, ता. जुन्नर, सध्या रा. दिघी) असे विवाहितेचे नाव आहे. तर पद्माकर साबळे (२४, मूळगाव हडसर, जुन्नर) असे तरुणाचे नाव आहे. प्रेमसंबंधातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना दिघी येथे दोन वर्षांपासून पतीसोबत राहाण्यास आली होती. तिला साडेचार वर्षाची मुलगी आहे. पती भोसरी एमआयडीसीतील कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करतो. नेहमीप्रमाणे पती कामावर गेलेला असताना, ती घरी एकटीच होती. गावाकडील पूर्वीची ओळख असलेला पद्माकर साबळे तिच्या घरी आला. त्यांच्यात वाद झाला. सपनाचा भाऊ याच परिसरात राहातो. सपनाच्या घरात आरडाओरडा सुरू असल्याचे त्याला समजले.
तो सपनाच्या घरी आला. दरवाजा वाजवला, त्या वेळी सपनाने दरवाजा उघडला, परंतु ती रक्ताने माखलेली होती. काही क्षणातच ती खाली कोसळली. बाजूला पद्माकर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सपनाच्या भावाने तिच्या पतीला फोनवरून माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सपना व पद्माकर यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणले. परंतु पद्माकरचा अगोदरच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर सपनाचा रुग्णालयात नेल्यानंतर मृत्यू झाला.
दोघांच्या शरीरावर हत्याराने वार केल्याच्या जखमा होत्या. घरातील चाकूने हाताच्या शिरा कापल्याचे निदर्शनास आले. पद्माकरच्या पोटावरही चाकूचे वार होते. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आले.

ते होते एकाच गावचे रहिवासी

सपना भले व पद्माकर साबळे हे जुन्नर येथील एकाच गावचे रहिवासी होते. साबळे आणि सपनाची पूर्वीपासून ओळख असल्याने त्यांची अधूनमधून भेट होत असे. सपनाच्या पतीबरोबरही त्याची ओळख होती. सपनाचा भाऊसुद्धा त्याला ओळखत असे. पद्माकरसुद्धा काही महिन्यांपासून पुण्यातच राहण्यास आला होता. सपनाचा विवाह झाल्यानंतरही पद्माकर तिला भेटण्यास येत असे. यावरून त्यांच्यात खटके उडत होते. यामुळेच दोघांनी जीवनयात्रा संपविली असावी, अशी चर्चा आहे.

Web Title: Two suicides in love in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.