ट्रकच्या धडकेत मुंबईच्या दोन पोलिसांचा मृत्यू
By Admin | Updated: May 7, 2015 03:20 IST2015-05-07T03:20:18+5:302015-05-07T03:20:18+5:30
नादुरुस्त इनोव्हाला भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुंबईतील सीआयडीचे दोन कर्मचारी जागीच ठार, तर तीन जखमी झाले.

ट्रकच्या धडकेत मुंबईच्या दोन पोलिसांचा मृत्यू
कोल्हापूर : नादुरुस्त इनोव्हाला भरधाव ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मुंबईतील सीआयडीचे दोन कर्मचारी जागीच ठार, तर तीन जखमी झाले. हा अपघात बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हातकणंगले तालुक्यातील घुणकी येथे ओढ्याच्या पुलाजवळ घडला. हे सर्वजण कोल्हापूर येथे अधिकाऱ्याच्या घरातील विवाहानिमित्त जात होते़
राजू बाबू सोनवणे (४८,), अब्दुल रशीद महमंद शेख (४२) अशी मृतांची नावे आहेत. तर जखमींमध्ये चालक संदीप रावजी घोडे (४०, रा. चेंबूर, मुंबई), बिरुदेव बाबासो शिंदे (४७, रा. नवी मुंबई), रवींद्र विनायक केळकर (४७, रा. घाटकोपर-मुंबई) यांचा समावेश आहे़ त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर पेठवडगाव पोलिसांनी त्यांना मुंबईकडे पाठविले.
मुंबईतील गुन्हे अन्वेषण परिमंडळ ६ (सीआयडी)चे सात कर्मचारी कोल्हापूर येथे लग्नकार्यासाठी इन्होवाने मंगळवारी रात्री दहा वाजता कोल्हापूरकडे निघाले होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली. यात शेख आणि सोनावणे ठार झाले तर दुरुस्तीचे काम करणारे शिंदे, केळकर व घोडे हे बाजूला फेकले गेले. सुदैवाने रघुनाथ साताप्पा पाटील (पोलीस निरीक्षक) व मनोहर भंडारी (सहायक पोलीस निरीक्षक) बचावले. घटनेची माहिती मिळताच पेठवडगाव पोलीस व महामार्ग मदत केंद्राच्या पथकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. दुपारी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर सोनवणे व शेख यांचे मृतदेह मुंबईला पाठविण्यात आले. (प्रतिनिधी)
असा घडला अपघात...
घुणकी गावाजवळ कारमध्ये बिघाड झाल्याने ती रस्त्याच्या कडेला उभी केली होती. दरम्यान, बुधवारी सकाळी मुंबईहून कर्नाटककडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली़ त्यामुळे कार पंधरा फूट फरफटत जाऊन बाजूच्या नाल्यात पंचवीस फूट खोल खड्ड्यात पडली. यात अब्दुल रशीद महमंद शेख व राजू बाबू सोनवणे हे जागीच ठार झाले,