हातात डुप्लिकेट चाव्यांचा गुच्छा घेऊन शहरात फिरायचे, एखादी दुचाकी दिसली की ती चोरून दिवसभर शहरात रपेट मारायची आणि पेट्रोल संपले की ती सोडून द्यायची... असा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला. केवळ दुचाकी चालविण्याचा 'शौक' पूर्ण करण्यासाठी हे कृत्य करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना विठ्ठलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सहा दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
उल्हासनगरात रस्त्याच्या कडेला किंवा घराबाहेर पार्किंग केलेल्या दुचाकी अचानक गायब होण्याचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी पोलीस उपायुक्त सचिन गोरे त्यांच्याकडे आले. त्यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दुचाकी चोरांचा छडा लावण्याचे आदेश दिले. विठ्ठलवाडी पोलिसांनी तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका ठिकाणी दोन तरुण दुचाकीला डुप्लिकेट चावी लावून ती चोरून नेताना दिसले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास करत या दोघांनाही ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आल्यावर पोलीसही चक्रावून गेले.
विठ्ठलवाडी पोलिसांनी पोलीस खाक्या दाखवताच या मुलांनी गुन्ह्याची कबुली दिली. या मुलांकडे डुप्लिकेट चाव्यांचा एक मोठा गुच्छा असायचा. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्याना गुच्छातील एक-एक चावी लावून बघायची, ज्या गाडीला चावी बसेल ती घेऊन पळ काढायचा. कोणताही आर्थिक फायदा किंवा विक्री करण्यापेक्षा केवळ शहरभर फिरण्याचा शौक पूर्ण करणे हाच त्यांचा हेतू होता. गाडीतले पेट्रोल संपले की ती गाडी एखाद्या ठिकाणी लावून हे दोघे मोकळे व्हायचे.
६ दुचाकी जप्त
या दोन्ही मुलांकडून आतापर्यंत ६ महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. दुचाकी चालविण्याच्या छंदापायी त्यांनी या चोऱ्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. (अशोक कोळी- वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विठ्ठलवाडी पोलीस ठाणे)
पोलिसांचे नागरिकांना आवाहन
विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दुचाकी चोरीचा छडा लावला. मात्र या घटनेमुळे अल्पवयीन मुलांच्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पालकांनी आपल्या मुलांच्या हालचालींकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे आवाहन कोळी यांनी केले.
Web Summary : Two Ulhasnagar minors, stealing bikes with duplicate keys for joyrides until the petrol ran out, were apprehended. Vithalwadi police recovered six stolen vehicles. The act raised concerns about juvenile delinquency, prompting calls for parental vigilance.
Web Summary : उल्हासनगर में दो नाबालिग डुप्लिकेट चाबियों से बाइक चुराकर मौज मस्ती करते थे। पेट्रोल खत्म होने पर छोड़ देते थे। विट्ठलवाड़ी पुलिस ने छह वाहन बरामद किए। किशोर अपराध पर चिंता, अभिभावकों से सतर्कता का आह्वान किया गया।