एटीएमचे दोन कोटी लुटले
By Admin | Updated: January 17, 2015 06:04 IST2015-01-17T06:04:00+5:302015-01-17T06:04:00+5:30
मिलन सब-वे परिसरात दिवसाढवळ्या बँकेची तब्बल २ कोटींची रोकड लुटण्यात आली. ही रोकड एटीएम मशीनमध्ये भरण्यात येणार होती

एटीएमचे दोन कोटी लुटले
मुंबई : मिलन सब-वे परिसरात दिवसाढवळ्या बँकेची तब्बल २ कोटींची रोकड लुटण्यात आली. ही रोकड एटीएम मशीनमध्ये भरण्यात येणार होती. हे कंत्राट ज्या कंपनीकडे होते त्याच कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने आपल्या अन्य साथीदारांना हाताशी धरून हा गुन्हा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
एटीएम मशिनमध्ये रोकड भरण्यासाठी एचडीएफसी बँकेने खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. या कंपनीने रोकड सुरक्षितपणे एटीएमपर्यंत पोहोचावी यासाठी ट्रान्स सिक्युरिटीशी करार केला होता. ट्रान्स कंपनीचे चार सुरक्षा रक्षक सकाळी लोअर परळ येथून बँकेचे २ कोटी १३ लाख रुपये घेऊन मीरारोड येथे निघाले. रोकड ज्या व्हॅनमध्ये होती ती ट्रान्स कंपनीची होती. या व्हॅनमध्ये शाबीर अली हा नवा सुरक्षा रक्षक होता. त्याने मिलन सब-वे परिसरात पोहोचताच व्हॅन थांबविण्याची विनंती चालकाला केली. मित्राकडून हजार रुपये घ्यायचे आहेत, अशी थाप त्याने मारली. काही वेळात तो चहा घेऊन व्हॅनमध्ये पोहोचला. तो चहा पिऊन व्हॅनमधील दोन सुरक्षा रक्षक बेशुद्ध पडले. हीच संधी साधून व्हॅनचा पाठलाग करणारी झेन कार पुढे आली. शाबीरनेच तीन साथीदारांच्या सहाय्याने व्हॅनमधील २ कोटींची रोकड घेऊन पळ काढला.