दोन लाखांसाठी पत्नीला विष पाजले
By Admin | Updated: April 9, 2016 03:18 IST2016-04-09T03:18:34+5:302016-04-09T03:18:34+5:30
माहेरहून दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून पतीने दूधातून विष पाजून पत्नीला मारल्याची घटना गुरुवारी सकाळी जिंतूर तालुक्यातील सायखेडा येथे घडली.

दोन लाखांसाठी पत्नीला विष पाजले
चारठाणा (जि. परभणी) : माहेरहून दोन लाख रुपये आणले नाहीत म्हणून पतीने दूधातून विष पाजून पत्नीला मारल्याची घटना गुरुवारी सकाळी जिंतूर तालुक्यातील सायखेडा येथे घडली. विषारी दूध प्यायल्याने दोन वर्षांच्या मुलीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात सासरच्या आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून यातील पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सायखेडा येथील रामा वसंत राठोड याने पत्नी मीराबाई (३०) हिच्याकडे मागील काही महिन्यांपासून शेतात विहीर खोदण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, असा तगादा लावला होता. गुरुवारी सकाळी रामाने तिला विषयुक्त दूध पाजले. विष मिसळल्याचे माहीत नसल्याने मीरा यांनी हेच दूध आपली मुलगी वैष्णवीला पाजले. त्यामुळे दोघींचाही मृत्यू झाला. मीरा यांचे वडील काशीनाथ पवार हे चारठाणा पोलीस ठाण्यात गेले असता फिर्याद घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. त्यांची पोलिसांशी बाचाबाची झाल्यानंतर रात्री उशिरा रामा राठोड याच्यासह कुटुंबातील आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.