दोन लाखग्राहक लिंकविना ‘गॅस’वर--लोकमत विशेष

By Admin | Updated: December 26, 2014 00:17 IST2014-12-25T22:41:34+5:302014-12-26T00:17:50+5:30

अनुदान योजना : एजन्सींची पळापळ; १ जानेवारीपासून अनुदान बँकेत जमा होणार

Two lakh subscribers on 'Gas' - Lokmat Special | दोन लाखग्राहक लिंकविना ‘गॅस’वर--लोकमत विशेष

दोन लाखग्राहक लिंकविना ‘गॅस’वर--लोकमत विशेष

अंजर अथणीकर- सांगली --केंद्र शासनाने गॅस ग्राहकांच्या बँक खात्यात गॅसचे अनुदान थेट जमा करण्याची सुधारित योजना सुरू केली असून, जिल्ह्यामध्ये ही योजना १ जानेवारीपासून सुरू होत आहे. मात्र जिल्ह्यातील २ लाख ११ हजार ७९९ गॅस ग्राहकांनी अद्याप आधार कार्ड आणि बँक खाते लिंक न केल्याने त्यांचे अनुदान रखडणार आहे. ही टक्केवारी ५४ टक्के आहे. जिल्ह्यामध्ये ४५.४९ टक्के ग्राहकांनीच आधार कार्ड आणि बँक खाते लिंक केले असल्यामुळे त्यांचे अनुदान आता बँकेत जमा होणार आहे. दरम्यान, बँक खाते लिंक करण्याची जबाबदारी आता गॅस एजन्सी व विक्री प्रतिनिधींना देण्यात आली असून, त्यांची नोंदणीसाठी पळापळ सुरू आहे.
गॅसचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. ग्राहकांनी आधार कार्ड व बँक खाते न काढल्याने ही योजना रखडत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या गॅस ग्राहकांंकडे आधार कार्ड व बँक खाते उपलब्ध आहे, त्या गॅस ग्राहकांंनी आधार कार्ड व बँक खात्याची माहिती संबंधित गॅस एजन्सीकडे देऊन नोंदणी करून घेणे गरजेचे आहे. ज्या गॅस ग्राहकाचे बँक खाते आहे, परंतु आधार कार्ड नाही, अशा गॅस ग्राहकांचेही अनुदान बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. गॅस ग्राहकांनी बँक खाते सुरू असल्याची व आधार कार्ड लिंक झाले असल्याबाबतची खात्री करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात अद्याप निम्म्याहून अधिक ग्राहकांनी बँकेची लिंक न दिल्याने त्यांचे अनुदान थांबणार आहे. यासाठी आणखी मुदतवाढ देण्यात येणार आहे. आता ज्यांचे खाते लिंक आहे, त्यांचे गॅस अनुदान १ जानेवारीपासून बँक खात्यात जमा होणार आहे. इतरांनी बँक खाते आधार कार्डाशी लिंक करून घ्यावे, यासाठी एजन्सी व गॅसच्या विक्री प्रतिनिधींनी प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत त्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे.


भारत पेट्रोलियम
एकूण एजन्सीज् : १३
एकूण ग्राहक : १,७०,०८७
आधारचे ग्राहक : १,०५५९५
आधारची टक्केवारी : ६२.८ टक्के
बँक लिंकचे ग्राहक : ७८,२५२
बँक लिंक : ४६.०१ टक्के




हिंदुस्थान पेट्रोलियम
एकूण एजन्सीज् : ३४
एकूण ग्राहक : २,१७,६७७
आधारचे ग्राहक : १,२९,८३२
आधारची टक्केवारी : ५९.६५ टक्के
बँक लिंकचे ग्राहक : ९५,१२७
बँक लिंक : ४३.७ टक्के


इंडियन आॅईल
एकूण एजन्सीज् : ७
एकूण ग्राहक : ७७,८१४
आधारचे ग्राहक : ४६,८६५
आधारची टक्केवारी : ६०.२३ टक्के
बँक लिंकचे ग्राहक : ३८,४२०
बँक लिंक : ४९.३७ टक्के


वंचित राहणाऱ्यांची संख्या अधिक का?
जिल्ह्यात बोगस गॅस ग्राहकांची संख्या अधिक.
इतरांचे कनेक्शन हस्तांतर करून घेण्यात अडवणूक
कनेक्शन हस्तांतरणाऐवजी नवीन घेण्याची कंपनीकडून सक्ती
वारसा हस्तांतरणामध्ये अडचणी
जुन्या कनेक्शनचे नूतनीकरण करण्यासाठी नव्याप्रमाणे अनामत रकमेची कंपनीकडून मागणी
नोंदणीसाठी गॅस ग्राहकांकडून टाळाटाळ व नियमांपासून अनभिज्ञता


बाजारभावाने ७८८ रुपयांना गॅस
१ जानेवारीपासून ज्यांचे अनुदान बँक खात्यात जमा होणार आहे, त्यांना सध्या तरी ७८८ रुपयांनी गॅस सिलिंडर (१४ किलोचा) खरेदी करावा लागणार आहे. ज्यांचे बँक खाते लिंक नाही, मात्र अनुदान सुरू आहे, त्यांना ४५८ रुपये दराने सिलिंडर मिळणार आहे.
लिंक करूनही एसएमएस
अनेक ग्राहकांनी यापूर्वीच आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केले आहे, त्यांना पुन्हा लिंक करण्यासंदर्भात मोबाईलवर संदेश येत आहेत.


शासनानेच मध्यंतरी ही प्रक्रिया थांबवली होती. गेल्या महिन्यापासून पुन्हा नोंदणी सुरु झाली आहे. ग्राहकांनीही नोंदणी करून घ्यावी. पूर्वीप्रमाणेच गॅस हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू करावी, यासाठी कंपन्यांकडून अडवणूक सुरू आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
- सुलेमान हुक्केरी, निमंत्रक, गॅस ग्राहक कृती समिती, सांगली


जिल्ह्यात १ जानेवारीपासून गॅस अनुदान ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. ज्यांनी बँक खाते आधार कार्डाशी लिंक केलेले नाही, त्यांनी ते करून घ्यावे. यापूर्वी ज्यांनी बँकेत कागदपत्रे जमा केली आहेत, त्यांनी पुन्हा एकदा बँकेत जाऊन खात्री करुन घ्यावी. यापुढे एजन्सी चालकांकडून याचा आढावा घेण्यात येणार आहे.
- भाऊसाहेब गलांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी.

Web Title: Two lakh subscribers on 'Gas' - Lokmat Special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.