म्हसावदचे दोन मजूर ‘मालामाल’
By Admin | Updated: December 30, 2016 22:22 IST2016-12-30T22:22:33+5:302016-12-30T22:22:33+5:30
सेंट्रल बँकेच्या शाखेत व्यवसायाने हातमजूर असलेल्या दोघांच्या खात्यावर दोन कोटी ३९ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम जमा झाल्याची माहिती आहे.

म्हसावदचे दोन मजूर ‘मालामाल’
ऑनलाइन लोकमत
म्हसावद, दि. 30 - शहादा तालुक्यातील म्हसावद येथील सेंट्रल बँकेच्या शाखेत व्यवसायाने हातमजूर असलेल्या दोघांच्या खात्यावर दोन कोटी ३९ लाख ५२ हजार रुपयांची रक्कम जमा झाल्याची माहिती आहे. मालामाल झालेल्या मजुरांना मात्र हे पैैसे कोणी, केव्हा टाकले याबाबत कोणतीही माहिती नाही.
म्हसावद येथील सेंट्रल बँकेत खाते असलेल्या अंजनाबाई संतोष पाटील यांच्या खात्यावर ४५ लाख रुपये अचानकपणे जमा झाल्याचे दिसून आले, तर तोरणमाळ येथील रहिवासी सुरेश मानसिंग नाईक यांच्या नावे ८६ लाख ५२ हजार रूपये जमा झाल्याची माहिती आहे. याबाबत सेंट्रल बँकेच्या व्यवस्थापक निरज विद्यार्थी यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला. बँकेतील खात्याची माहिती गोपनीय असल्याने ती देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
या घटनेनंतर म्हसावद येथील अंजनाबाई पाटील यांच्यासोबत चर्चा केली असता, त्यांनी याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. अंजनाबाई व त्यांचे पती संतोष पाटील हे मूळचे शिरपूर तालुक्यातील अर्थे येथील रहिवासी आहेत़ गेल्या आठ वर्षांपासून मजुरीनिमित्त ते म्हसावद येथे राहतात़ तर तोरणमाळ येथील सुरेश नाईक यांच्यासोबत संपर्क होऊ शकलेला नाही.