हरविलेल्या दोन मुली वाराणसीत सापडल्या!
By Admin | Updated: April 29, 2016 06:06 IST2016-04-29T06:06:52+5:302016-04-29T06:06:52+5:30
नागपाडा मिसिंग मिस्ट्रीमागे महिला आरोपी असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

हरविलेल्या दोन मुली वाराणसीत सापडल्या!
मुंबई : नागपाडा मिसिंग मिस्ट्रीमागे महिला आरोपी असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. हरविलेल्या तीन मुलांपैकी दोन मुली वाराणसीत सापडल्या आहेत. आंटी म्हणून बोलत असलेल्या या महिलेसोबत तीन चिमुकले मुंबईहून वाराणसीत पोहचले. त्यानंतर ४ वर्षीय मुलासोबत ती निघून गेल्याचे मुलींचे म्हणणे आहे. त्यामुळे या संशयित आंटीच्या मागावर सध्या पोलीस आहेत.
नागपाडा नयानगर येथून २१ ते २४ एप्रिलदरम्यान तब्बल चार मुले बेपत्ता झाली. यापैकी २४ तारखेला खेळता खेळता एकाच वेळी तरन्नुम खासुल (६), गुलफाम खासुल (४) आणि कुलसुम खान (६) तिघेही गायब झाल्याने खळबळ उडाली होती. स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा याचा अधिक तपास करत असताना गुरुवारी यापैकी दोन मुली वाराणसीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सध्या त्या अस्मिता चाईल्ड लाइन संस्थेच्या ताब्यात आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी ७.१० वाजण्याच्या सुमारास वाराणसीत दोन मुली घाबरलेल्या अवस्थेत फिरतअसताना एका हवालदाराचे लक्ष त्यांच्याकडे गेले. चौकशीत त्या मुंबईहून एका महिलेसोबत आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पोलीस हवालदाराने त्या मुलींना तत्काळ अस्मिता चाईल्ड लाइफ संस्थेच्या ताब्यात दिले. त्यांनी केलेल्या चौकशीत त्या दोघी तरन्नुम आणि कुलसुम असल्याची माहिती समोर आली. संस्थेकडून गुरुवारी याबाबत माहिती मिळाली असून, शुक्रवारी पहाटेच्या टे्रनने पोलिसांचे पथक तेथे रवाना होणार असल्याची माहिती नागपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक शिवाजी कदम यांनी दिली. (प्रतिनिधी)