तिढा सुटणार दोन दिवसांत
By Admin | Updated: September 12, 2014 02:17 IST2014-09-12T02:17:44+5:302014-09-12T02:17:44+5:30
महायुतीच्या जागावाटपाबाबत शिवसेना आणि भाजपा या दोन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी घटकपक्षांबरोबर स्वतंत्रपणे चर्चा करूनही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही.

तिढा सुटणार दोन दिवसांत
संदीप प्रधान, मुंबई
महायुतीच्या जागावाटपाबाबत शिवसेना आणि भाजपा या दोन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी घटकपक्षांबरोबर स्वतंत्रपणे चर्चा करूनही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. पण आता येत्या दोन दिवसांत एका टेबलवर सर्वांनी बसून चहा-नाश्त्यासह चर्चेला सुरुवात करण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्रीवरील बैठकीत गुरुवारी घेण्यात आला.
महायुतीमधील जागावाटप निश्चित होत नसतानाच शिवसेनेला १५३ व भाजपाला मित्रपक्षांसह १३५ जागा सोडण्याचा फॉर्म्युला मातोश्रीकडून पुढे केला गेल्याने मित्रपक्षांमध्ये अस्वस्थतता पसरली आहे. रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, महादेव जानकर यांची राष्ट्रीय समाज पार्टी व विनायक मेटे यांचा शिवसंग्राम यांनी भरमसाठ जागांची मागणी केली आहे. भाजपाला आपल्या कोट्यातून या जागा द्यायच्या झाल्या तर १६ ते १८ जागांपेक्षा अधिक जागा देण्याची त्यांची तयारी नाही.
आतापर्यंत शिवसेनेकडून आमदार दिवाकर रावते हे स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्षाबरोबर बोलत होते तर खासदार संजय राऊत यांना रिपाइंशी वाटाघाटी करण्यास सांगितले होते. भाजपामध्ये प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे मित्रपक्षांबरोबर चर्चा करीत होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्षाला शिवसेना-भाजपाकडून हव्या असलेल्या बहुतांश जागा पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने त्यांच्यासोबतची चर्चा लवकर संपली. मात्र रिपाइंकडून मुंबई व मराठवाड्यातील जागांची मागणी केली जात असल्याने त्यांच्यासमवेतची चर्चा फलद्रुप झालेली नाही. त्यामुळेच रामदास आठवले दररोज इशारे देत आहेत.
गुरुवारी आठवले हे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. परंतु आता त्यांना शुक्रवारी भेटीचे आश्वासन मिळाले आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्याने त्याच मागणीकरिता लढणाऱ्या शिवसंग्रामला शिवसेना-भाजपा धूप घालत नाही. नाममात्र जागांवर त्यांची बोळवण करण्याचा दोन्ही पक्षांचा इरादा आहे. या पार्श्वभूमीवर आता स्वतंत्रपणे चर्चा करीत न बसता एकत्र बसून चर्चा करण्याचे ठाकरे-फडणवीस भेटीत ठरले.
निवडणूक तारखांची घोषणा अजून झालेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाचे चित्र अद्याप धूसरच आहे आणि वाटाघाटींवर पितृपक्षाचे सावट आहे. त्यामुळे महायुतीच्या टेबलावरील चर्चेच्या आणखी काही फेऱ्या होतील, यथेच्छ चहा-फराळाचा आस्वाद महायुतीचे नेते घेतील आणि त्यानंतरच जागावाटपाचा तिढा सुटेल, असे बोलले जात आहे.