पानसरे हल्ल्याचा दोन दिवसांत छडा

By Admin | Updated: February 18, 2015 23:42 IST2015-02-18T23:13:18+5:302015-02-18T23:42:48+5:30

पोलीस अधीक्षक शर्मा : महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची सूत्रांची माहिती

In the two days of the attack, | पानसरे हल्ल्याचा दोन दिवसांत छडा

पानसरे हल्ल्याचा दोन दिवसांत छडा

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा दोन दिवसांत छडा लावला जाईल. त्यासाठी जखमी उमा पानसरे यांचा जबाब महत्त्वपूर्ण असून, तो लवकरच घेण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी बुधवारी दिली. दरम्यान, दोन दिवसांच्या तपासामध्ये हाती लागलेले महत्त्वाचे धागेदोरे पोलीस अतिशय बारकाईने व तांत्रिकदृष्ट्या तपासून पाहत आहेत. हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे असल्याने पोलिसांनी तपासाबाबत अतिशय गोपनीयता पाळली असल्याचे सूत्रांनी सांगितले. हल्लेखोर सोमवारी सकाळी ९.२४ च्या सुमारास मोटारसायकलवरून येत असल्याचे चित्रीकरण सरस्वती चुनेकर विद्यामंदिरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना मिळाले आहे. त्यानुसार ते कोठून आले, याची खात्री करण्यासाठी शहरातील टोलनाके व पानसरे यांच्या निवासस्थानाकडे येणाऱ्या सर्व मार्गांवरील सीसीटीव्हींचे फुटेज पोलिसांनी मिळविले आहे. राज्यभरातील पोलिसांची २० पथके हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. यासंदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी सांगितले की, ‘रुग्णालयामध्ये उमा पानसरे यांचा जबाब घेण्यासाठी गेलो होतो. त्यांना मी ‘आई, मला ओळखता का?’ असे विचारले. त्यावर त्यांनी ‘हां, ओळखते’ असे सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी त्या अद्यापही धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. त्यांचा जबाब घेण्यासाठी थोडा वेळ द्या,’ असे सांगितल्याने त्यांचा जबाब घेतला नाही. लवकरच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांचा जबाब आम्ही घेणार आहोत. हल्ला कोणी केला? याचा पोलीस शोध घेत आहेत; परंतु कोणापासून धोका होता, असे कोण करू शकते, याची महत्त्वपूर्ण माहिती उमा पानसरे यांच्या जबाबातून मिळणार आहे.’ (प्रतिनिधी)


ताण हलका
सायंकाळी पानसरे यांची स्नुषा मेघा, त्यांची कन्या स्मिता व मेघा यांच्यासह जावई बन्सी सातपुते, प्रा. विलास रणसुभे, मिलिंद कदम, सतीश कांबळे, सुनील जाधव, निहाल शिपूरकर, डॉ.चैतन्य शिपूरकर आदींची एकत्रित भेट झाली. आज मनावरील ताण खूप कमी झाल्याची प्रतिक्रिया मेघा पानसरे यांनी व्यक्त केली. प्रकृतीचा धोका टळला असून आता तपासाचे पुढे काय होणार, हीच आमची चिंता असल्याचे मेघा पानसरे यांनी सांगितले.


गोविंद पानसरे शुद्धीवर; प्रकृतीत आणखी सुधारणा
ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांची प्रकृती झपाट्याने सुधारत असून बुधवारी ते शुद्धीवर आले. त्यांच्या प्रकृतीचा धोका पूर्णत: टळला आहे. कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू असल्याने त्यांना बोलता येत नसले तरी त्यांनी सकाळी स्नुषा मेघा यांना त्यांनी खुणेनेच आपण बरे असल्याचे सांगितले. त्यामुळे पानसरे कुटुंबीयांसह त्यांच्या प्रकृतीकडे डोळे लावून बसलेल्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला.
त्यांच्या पत्नी सौ. उमा पानसरे यांची प्रकृतीतही सुधारणा झाली असून पोलिसांनी सायंकाळी त्यांचा काही वेळ जबाबही घेतला.
पानसरे दांपत्यावर सोमवारी दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील शास्त्रीनगरातील अ‍ॅस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोघांचीही प्रकृती सुधारत असल्याने पानसरे कुटुंबीयांवरील व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील ताण कमालीचा हलका झाला. बुधवारी रुग्णालयातील गर्दीही कमी झाली.

Web Title: In the two days of the attack,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.