टॉपवर्थ समूहाने स्पर्धेत मिळवले दोन कोल ब्लॉक्स

By Admin | Updated: August 23, 2015 00:06 IST2015-08-23T00:06:33+5:302015-08-23T00:06:33+5:30

मुंबईच्या टॉपवर्थ उद्योग समूहाने नुकत्याच झालेल्या कोळसा खाणींच्या लिलावात ३४ दशलक्ष टन साठे असलेल्या दोन कोळसा खाणी मिळविल्या आहेत. टॉपवर्थ ऊर्जा अ‍ॅण्ड मेटल्स कंपनीने

Two Coal Blocks In The Competition Of The Top Wirth Group | टॉपवर्थ समूहाने स्पर्धेत मिळवले दोन कोल ब्लॉक्स

टॉपवर्थ समूहाने स्पर्धेत मिळवले दोन कोल ब्लॉक्स

- सोपान पांढरीपांडे,  नागपूर
मुंबईच्या टॉपवर्थ उद्योग समूहाने नुकत्याच झालेल्या कोळसा खाणींच्या लिलावात ३४ दशलक्ष टन साठे असलेल्या दोन कोळसा खाणी मिळविल्या आहेत. टॉपवर्थ ऊर्जा अ‍ॅण्ड मेटल्स कंपनीने यवतमाळ जिल्ह्यातील मरकी मांगली-१ या कोळसा खाणीसाठी ७१५ रुपये प्रति टन बोली लावली होती. या खाणीसाठी सरकारी किंमत ५०५ रुपये प्रति टन होती. टॉपवर्थ ऊर्जाची बोली सर्वाधिक ठरून लिलावात कायम झाली.
‘मरकी मांगली-१ या खाणीत ९.९६ दशलक्ष टन कोळसा असून पुढील ३० वर्षांत कंपनी महाराष्ट्र सरकारला रॉयल्टीपोटी ५९७ कोटी रुपये देणार आहे; अशी माहिती टॉपवर्थ समूहाचे अध्यक्ष अभय लोढा यांनी ‘लोकमत’ला दिली. या खाणीसाठी ग्रेस इंडस्ट्रीज व लॉईडस् मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लि. या कंपन्याही स्पर्धेत होत्या.
मरकी मांगली-१ ही खाण बी एस इस्पात या कंपनीला २००८ साली मिळाली होती व गेल्या वर्षी कोळसा खाणपट्टे वाटपप्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने ज्या २०४ खाणींचे वाटप रद्द केले होते, त्यात ही खाणसुद्धा होती.
याच बरोबर टॉपवर्थ समूहाची दुसरी कंपनी क्रेस्ट स्टील अ‍ॅण्ड पॉवर कंपनीला छत्तीसगडमधील भास्करपारा ही खाण याच लिलावात मिळाली आहे. या खाणीसाठी सरकारी बोली ५१३ रु. प्रतिटन होती व क्रेस्ट स्टीलची ७५५ रु. प्रति टनाची बोली सर्वाधिक ठरली. या खाणीत २४.०६ दशलक्ष टन कोळसा आहे व त्याच्या रॉयल्टीपोटी कंपनी छत्तीसगड सरकारला पुढील ३० वर्षांत १८१६ कोटी रुपये महसूल देणार आहे. या खाणीसाठी जिंदल स्टील अ‍ॅँण्ड पॉवर व गोदावरी नॅचरल रिसोर्सेस या कंपन्या स्पर्धेत होत्या. भास्करपारा खाण याआधी बी.के. बिर्ला समूहाच्या ग्रासिम इंडस्ट्रीज व इलेक्ट्रोथर्म इंडिया यांना भागीदारीत मिळाली होती.

कंपनीचा अ‍ॅल्युमिनियम फॉइल प्रकल्पही उमरेडात
- टॉपवर्थ समूहाची कंपनी गुजरात फॉईल्स ही उमरेडमध्ये भारतातील सर्वात मोठा अ‍ॅल्युमिनियम फॉईलचा कारखाना उभारणार आहे. १५५० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पात दरवर्षी ६०,००० टन अ‍ॅल्युमिनियम फॉईल तयार होतील. या फॉईल्स औषधी गोळ्या व कॅप्सूलच्या पॅकिंगसाठी वापरल्या जातात, अशी माहिती गुजरात फॉईल्सचे वित्त अधिकारी जगदीश पारगांवकर यांनी दिली. भारतात औषधी गोळ्या/ कॅप्सूलच्या पॅकिंगसाठी दरवर्षी एक ते सव्वा लाख टन अ‍ॅल्युमिनियम फॉईल्स लागतात.
- गुजरात फॉईल्सचा १२००० टन प्रतिवर्ष क्षमतेचा एक प्रकल्प अहमदाबादजवळ आहे. परंतु तेवढ्याने बाजारातील मागणी पूर्ण होऊ शकत नसल्याने हा विस्तार प्रकल्प महाराष्ट्र सरकारच्या पाठपुराव्यामुळे उमरेडात टाकण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती टॉपवर्थ ऊर्जाचे संचालक सुरेंद्र लोढा यांनी दिली. यासाठी कंपनीने अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाचे (यूएसएफडीए) मानक प्राप्त केले आहे; त्यामुळे भारतातील बहुराष्ट्रीय औषध कंपन्या आमच्या अ‍ॅल्युमिनियम फॉईल्स वापरतात, असेही सुरेंद्र लोंढा म्हणाले.

Web Title: Two Coal Blocks In The Competition Of The Top Wirth Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.