पोलीस भरतीतील उमेदवारांना मिळणार दोन केळी, ग्लुकोज
By Admin | Updated: June 20, 2014 01:02 IST2014-06-20T01:02:36+5:302014-06-20T01:02:36+5:30
पोलीस भरतीदरम्यान पाच उमेदवारांचा मृत्यू झाल्याने झोप उडालेल्या पोलीस महासंचालकांनी आता भरतीसाठी नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. आता धावण्यापूर्वी उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.

पोलीस भरतीतील उमेदवारांना मिळणार दोन केळी, ग्लुकोज
सावधगिरी : धावण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी, दिवसा ‘आऊट डोअर’ला मनाई
यवतमाळ : पोलीस भरतीदरम्यान पाच उमेदवारांचा मृत्यू झाल्याने झोप उडालेल्या पोलीस महासंचालकांनी आता भरतीसाठी नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहे. आता धावण्यापूर्वी उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
बुधवारी रात्री पोलीस महासंचालक कार्यालयातून भरतीची ही मार्गदर्शक तत्वे बिनतारी संदेश यंत्राद्वारे जारी करण्यात आली. पोलीस भरतीत शारीरिक क्षमता चाचणीदरम्यान पुरुषांसाठी पाच किलोमीटर तर महिलांसाठी तीन किलोमीटर रनिंग असते. या रनिंगपूर्वी प्रत्येक उमेदवाराची वैद्यकीय तपासणी केली जाईल. तो धावण्यासाठी सक्षम आहे अथवा नाही हे तपासले जाईल. सक्षम नसल्यास त्याला रनिंग करू देऊ नका, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय तपासणीअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांना रनिंगपूर्वी दोन केळी आणि ग्लुकोज पावडर देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही रनिंग कोणत्याही परिस्थितीत सकाळी ८ पूर्वी आणि सायंकाळी ४.३० नंतर घ्यावी. शारीरिक क्षमता चाचणी सकाळी ८ ते सायंकाळी ४.३० या वेळात घेतली जाऊ नये असे आदेश महासंचालकांनी जारी केले आहे.
यावर्षी रखरखत्या उन्हाळ्यात राज्यातील सर्वच जिल्ह्यात पोलीस भरती घेण्यात आली. शारीरिक क्षमता चाचणीसह त्यांची लेखी परीक्षाही खुल्या मैदानात घेतली गेली. या भरतीत मुंबईमध्ये पाठोपाठ पाच उमेदवारांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यभर खळबळ निर्माण झाली. हिवाळ्यामध्ये ही भरती घेणे अपेक्षित असताना उन्हाळ्यातच का घेतली गेली, म्हणून महासंचालक कार्यालयाला धारेवर धरले गेले. अन्य जिल्ह्यातसुद्धा अनेक उमेदवार शारीरिक क्षमता चाचणीदरम्यान भोवळ येऊन पडल्याची उदाहरणे आहेत. काही ठिकाणी ही भरती प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अनेक ठिकाणी अद्यापही अधिक जागांमुळे प्रक्रिया सुरूच आहे. अखेर या भरतीसाठी खबरदारी म्हणून महासंचालकांनी नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. या पुढील भरती या तत्वानुसार करण्याचे आदेश आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)