रोज २० टॅँकर मैला थेट पंचगंगेत
By Admin | Updated: June 4, 2015 00:58 IST2015-06-04T00:52:12+5:302015-06-04T00:58:15+5:30
महापालिकेचा टँकर पकडला : जयंती नाल्यावर ‘प्रजासत्ताक’, ’स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांचा उपायुक्तांना घेराव

रोज २० टॅँकर मैला थेट पंचगंगेत
कोल्हापूर : गेले तीन दिवस ओसंडून वाहणाऱ्या जयंती नाल्यातून मैला थेट पंचगंगेत मिसळत असल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमक्ष मैला सोडणाऱ्या टॅँकरला रंगेहात पकडले.
यानंतर पंचनामा करण्यासाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्या अंगावर कार्यकर्ते धावून गेले. रोज वीसहून अधिक टॅँकर मैला पंचगंगेत मिसळत असल्याच्या संशयावरून मंडळाने महापालिकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली.
सकाळी अकराच्या सुमारास प्र्रिन्स शिवाजी गार्डनसमोरील जयंती नाल्यावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याचे समजताच ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांसह दिलीप देसाई घटनास्थळी पोहोचले. यावेळी एम०९ बीसी १५७४ या टॅँकरमधून नाल्याच्या पंपहाउसच्या आउटलेटमधून मैला नाल्यात सोडत असल्याचे आढळून आले. हे पाहून कार्यकर्ते आक्रमक झाले.
तक्रारीनंतर घटनास्थळी आलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एन. एच. शिवांगी, उपायुक्त विजय खोराटे व जलअभियंता मनीष पवार यांना कार्यकर्त्यांनी अक्षरश: धारेवर धरले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, बंडू पाटील, आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांना उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या पवार ाांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. आयुक्त घटनास्थळी आल्याखेरीज पंप हाउसमधून कोणालाही सोडणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे येथील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले.
दरम्यान, लक्ष्मीपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उपायुक्त विजय खोराटे यांनी आठ तासांत जयंती नाल्यातून वाहणारे पाणी रोखण्याचे आश्वासन दिले. बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी लवकरच प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे महापालिका प्रशासनाने लेखी आश्वासन दिले.
नाल्यात ढकलून देऊ
काही बांधकाम व्यावसायिकांचे हित सांभाळण्यासाठीच जयंती नाल्यावरील बंधाऱ्याची उंची वाढविण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप दिलीप देसाई यांनी केला. बंधाऱ्याची उंची वाढविण्यास चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांना नाल्यात ढकलून देण्याचा इशारा ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दिला.