चोवीस वर्षीय ओंकार बनला सैन्यदलात कॅप्टन
By Admin | Updated: December 10, 2014 23:49 IST2014-12-10T22:53:02+5:302014-12-10T23:49:26+5:30
आष्ट्याच्या शिरपेचात मानाचा तुरा : शहरातील पहिला उच्चपदस्थ अधिकारी

चोवीस वर्षीय ओंकार बनला सैन्यदलात कॅप्टन
आष्टा : सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील ओंकार किरण महाजन (वय २४) याची अल्पावधितच भारतीय सैन्यदलात कॅप्टनपदी निवड झाली आहे. घरी सैन्यदलातील कोणताही वारसा नसताना, जिद्द, मेहनत व चिकाटीच्या जोरावर ओंकार महाजन याने सैन्यदलात उत्तुंग यश मिळविले. शहरातील पहिला कॅप्टन होण्याचा मान ओंकार महाजन याने पटकावित आष्ट्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
ओंकार हा आष्टा येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा. वडील किरण महाजन यांचे मेडिकलचे दुकान होते. आष्टा मेडिकल असोसिएशन व जायंटस् ग्रुप आॅफ आष्टाचे ते माजी अध्यक्ष आहेत. ओंकार याचे दहावीपर्यंतचे शिक्षण तासगाव येथील गुरूवर्य दादोजी कोंडदेव सैनिक शाळेत झाले. दहावीत चांगले गुण मिळाल्यानंतर त्याला सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था (एस.पी.आय.) औरंगाबाद या राज्य शासनाच्या संस्थेत प्रवेश मिळाला. दोन वर्षे कसून सराव केल्यानंतर त्याने १२ वीत यश मिळाले. टी. ई. एस. (टेक्निकल एन्ट्री)ला १६ जानेवारीला प्रवेश मिळाल्यानंतर डिसेंबर २००९ अखेर इंडियन मिलिटरी आॅफ मिलिटरी इंजिनिअरिंग येथे जानेवारी २०१० ते २०१३ अखेर ट्रेनिंग पूर्ण केले. ८ डिसेंबर २०१२ ला ओंकारची सैन्यदलात लेफ्टनंटपदी निवड झाली. वडिलांचा ८ डिसेंबर हा वाढदिवस. याचदिवशी ओंकारची लेफ्टनंटपदी निवड झाल्याने वडिलांना अनोखी भेट मिळाली. आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. २०१४ मध्ये त्याची हिस्सार (हरियाना) येथे आर्मड् इंजिनिअरिंग लेफ्टनंट पदावरून कॅप्टनपदी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी नोकरीच्या वाटेवरूनच जाण्याऱ्या युवकांना ओंकारने वेगळा आदर्श घालून दिला आहे. (वार्ताहर)