वीस शेतकरी ऊसलागवडीपासून वंचित
By Admin | Updated: July 11, 2017 00:48 IST2017-07-11T00:48:47+5:302017-07-11T00:48:47+5:30
वाणेवाडी अंतर्गत येणाऱ्या मळशी या ठिकाणच्या वीस शेतकऱ्यांना ३५ ते ४० एकर अडसाली ऊसलागवडीपासून वंचित राहावे लागले आहे.

वीस शेतकरी ऊसलागवडीपासून वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
सोमेश्वरनगर : येथील महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वाणेवाडी अंतर्गत येणाऱ्या मळशी या ठिकाणच्या वीस शेतकऱ्यांना ३५ ते ४० एकर अडसाली ऊसलागवडीपासून वंचित राहावे लागले आहे. वाणेवाडी अंतर्गत येणाऱ्या मळशी या ठिकाणावरील सोळाआंबा येथील विद्युत रोहित्र २० जून रोजी जळाले होते. यावर अनेक शेतकऱ्यांनी वितरणचे संबंधित अधिकारी वरिष्ठ अभियंता म्हेत्रे तसेच कनिष्ठ अभियंता दीपक पाचुंदकर यांना भेटून तसेच लेखी तक्रार दिली.तरीदेखील या अधिकाऱ्यांनी याकडे काणाडोळा केल्याने ४० एकरांवरील अडसाली उसाची लागवड झाली नाही. सोमेश्वर कारखाना दि. १ जुलै ते ७ जुलै दरम्यान अडसाली ऊस लागवडीचा कार्यक्रम जाहीर करत असतो. या कालावधीत केल्या जाणाऱ्या अडसाली उसाच्या लागवडी पुढील हंगामात कारखाना सुरू होताना जात असतात. तर एक दिवस उशिरा केलेली उसाची लागवड तब्बल अडीच ते तीन महिन्यांनंतर कारखान्याला तुटून जाते. शेतकऱ्यांनी २० जूनपासून महावितरणच्या अधिकाऱ्यांचा पाठपुरावा केला होता. ‘साहेब, डीपी १ तारखेपर्यंत तरी बसवा राव. आमच्या लागणी राहतील..’ मात्र, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यातच एक मत नसल्याने आज बसवू उद्या बसवू करत गेल्या वीस दिवसांपासून रोहित्र बसविले गेले नाही. आणि कारखान्याने ठरवून दिलेली अडसाली उसाची लागवड तारीख संपून गेल्यावर ४० एकरांवरील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
तसेच, दर महिन्यात घरगुती बिले वाढवून देणे हे महावितरण चे नित्याचेच झाले आहे. वास्तविक वापर कमी असतानाही ग्राहकांना वीज बिलाचे आकडे वाढवून दिले जात असल्याने ग्राहकांना बिल कमी करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे. तर अनेक वीजबिलांवर मीटरचे फोटोच नसतात.
>हजारो ग्राहकांना जादा बिलाचा फटका...
महावितरणच्या रीडिंग घेण्यासाठी ठेवलेल्या कर्मचाऱ्याकडून दर महिन्याच्या ५ तारखेला घरगुती मीटरचे रीडिंग घेतले जात होते. मात्र, मागच्या महिन्यात २० तारखेला उशिरा रीडिंग घेतल्याने अनेक ग्राहकांचे १०० युनिटच्या रीडिंगच्या पुढे रीडिंग गेल्याने त्यांना ३ रूपये ५० पैशांऐवजी एका युनिटला ७ रूपये मोजावे लागले. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हजारो ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागला आहे.
अनेक वीजबिलांवर मीटरचे फोटोच नसतात. ती बिले गेल्या महिन्याच्या बिलावर अंदाजेच दिली जातात.
वाणेवाडी-मळशी येथील जळालेले रोहित्र बदलण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून ते अजूनही उपलब्ध झाले नाही. ते उद्या उपलब्ध होणार आहे. तसेच मुरूम याठिकाणी ग्राहकांचे युनिट जरी जादा झाले असले तरीही त्यांना ३ रूपये ५० पैशांप्रमाणेच युनिट दर लावला आहे.-दीपक पाचुंदकर,
कनिष्ठ अभियंता,
सोमेश्वरनगर महावितरण