बारावीत कोकण अव्वल
By Admin | Updated: May 28, 2015 00:58 IST2015-05-28T00:06:17+5:302015-05-28T00:58:06+5:30
राज्यात प्रथम : विभागात सिंधुदुर्गचा झेंडा, कोकणचा ९५.६८ टक्के निकाल; राज्याचा निकाल ९१.२६ टक्के

बारावीत कोकण अव्वल
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या घेण्यात आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत कोकण विभागीय मंडळाचा निकाल ९५.६८ टक्के इतका लागला आहे. सलग चौथ्या वर्षी कोकण मंडळाने राज्यात अव्वल स्थान मिळविले आहे. गतवर्षीच्या तुलनेत ०.६२ टक्क्यांनी निकाल अधिक असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष भीमराव कांबळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
राज्यातील एकूण नऊ मंडळांमध्ये कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक आहे. त्यापाठोपाठ अमरावती मंडळाचा ९२.५० टक्के, तर नागपूर मंडळाचा ९२.११ टक्के इतका निकाल लागला आहे. अमरावती व नागपूर मंडळांनी अनुक्रमे दुसरा, तिसरा क्रमांक मिळविला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेसाठी सचिव रमेश गिरी, सहसचिव किरण लोहार, सहायक सचिव चंद्रकांत गावडे, रत्नागिरी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी राजेंद्र अहिरे, सिंधुदुर्गचे शिक्षणाधिकारी रघुनाथ अटुगडे उपस्थित होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून ३१ हजार ५५२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३० हजार ३१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १६ हजार ५१४ विद्यार्थ्यांपैकी १५ हजार ५०९ विद्यार्थी (९३.९१ टक्के), तर १५ हजार १७३ विद्यार्थिनींपैकी १४ हजार ८०९ (९७.६० टक्के) विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातून २० हजार ६३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १९ हजार ७५ विद्यार्थी पास झाले असून, एकूण निकाल ९५.०८ टक्के इतका लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ११ हजार ६२७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ११ हजार २४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९६.७२ टक्के इतका लागला आहे.
यावर्षी कोकण विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्याने झेंडा फडकविला आहे.कोकण विभागात १९४ कनिष्ठ महाविद्यालये असून, २१ परीरक्षक केंद्रे, तर ४७ परीक्षा केंदे्र आहेत.दि.४ जूनला विद्यार्थ्यांना गुणपत्रके उपलब्ध होणार आहेत.(प्रतिनिधी)े
सर्वाधिक निकाल
विज्ञान शाखेचा
कोकण विभागात सर्वाधिक निकाल विज्ञान शाखेचा लागला आहे. विज्ञान शाखेत ९५.७२ टक्के, वाणिज्य शाखेत ९१.६0 टक्के, व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेत ८९.२0 टक्के, तर कला शाखेत ८६.३१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण आहेत.
कॉपीचे प्रमाण ०.०३ टक्के
कोकण विभागातून एकूण ३१ हजार ६८७ विद्यार्थी बसले होते. पैकी कॉपीचे एकूण ०.०८ प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे एकूण प्रमाण ०.०३ टक्के इतके आहे. राज्यात सर्वांत कमी कॉपीचे प्रमाण लातूर येथे असून, ०.०६ कॉपीचे प्रकार उघडकीस आले असून, टक्केवारी ०.०३ इतके आहे.
निकालाचा वाढता आलेख
मागील तीन वर्षांचा कोकण विभागाचा बारावीचा निकाल पाहता वाढता आलेख दिसून येत आहे. २०१२ मध्ये ८५.८८, २०१३ मध्ये ९४.८५, तर २०१४ मध्ये ९५.६ टक्के इतका निकाल लागला होता. यावर्षी ९५.६८ टक्के इतका निकाल लागला असून, निकालात ०.६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
पुनर्परीक्षार्थींचा निकाल ४७.७७ टक्के
कोकण विभागातून ९८८ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यापैकी ४७२ विद्यार्थी पास झाले आहेत. विभागाचा एकूण निकाल ४७.७७ टक्के इतका लागला आहे. पुनर्परीक्षार्थींमध्ये मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ४६.४७ टक्के, तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ५१.३२ टक्के इतके आहे.