पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. या परीक्षेत आर्मी पब्लिक स्कूल सदन कमांडच्या तुषार बारनवाल याने ९८.२ टक्के गुण मिळवत पुण्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर याच स्कूलच्या संकल्प सांगळे याने ९८ टक्के गुण मिळवत दुसरा येण्याचा मान मिळविला.देशातील १० लाख ४१ हजार ४८२ विद्यार्थ्यांनी सीबीएसईची इयत्ता बारावीची परीक्षा दिली होती. मंडळाकडून अद्याप गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली नसली तरी पुण्यातील मंडळाच्या शाळांकडून मिळालेल्या माहितीनुसार तुषारने पुण्यातून बाजी मारल्याचे दिसून येते. तुषार व संकल्प हे दोघेही आर्मी पब्लिक स्कूल सदन कमांडच्या विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहेत. याच शाळेच्या अरुनिमा अगरवाल हिने मानवशास्त्र विषयात ९४ टक्के गुण मिळवले आहेत तर वाणिज्य शाखेत संस्कृती सिंगने शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. औंध येथील डीएव्ही स्कूलच्या एब्रो बहुनिया हा ९७.४ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला. तर वाणिज्य शाखेत प्रियल जैन हिने ९५.६ टक्के गुण मिळवून पहिला येण्याचा मान मिळविला. वानवडी येथील दिल्ली पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. शाळेचे सर्व १०७ विद्यार्थी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेत प्रणव अगरवालने ९६.२ टक्के, मानवशास्त्र विषयात विद्या रवींद्रनाथने ९६ टक्के व वाणिज्य शाखेत आदिती निषित हिने ९६ टक्के गुण मिळवून पहिला क्रमांक मिळविला. केंद्रीय विद्यालय एअर फोर्स स्टेशन येथील शाळेचा वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के तर विज्ञान शाखेचा ९९ टक्के लागला आहे. अमतिमा रॉय ही ९५ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आली.खडकी येथील आर्मी पब्लिक स्कूलमध्ये प्रणव डॉली व मुस्कान नागपाल यांनी ९५.४ टक्के गुणांसह विज्ञान शाखेत संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेत नयन महाजन हिला ९४.२ टक्के तर मानवशास्त्र विषयात मुस्कान चहल हिला ८९ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळाला. गणेशखिंड येथील केंद्रीय विद्यालयातील सागर बारापत्रे ९२.८ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत तर वाय. श्रेया ही ९४.६ टक्के गुण मिळवून वाणिज्य शाखेत प्रथम आली. विखे पाटील शाळेतील ऋचा साठे ही विद्यार्थिनी ९६ टक्के गुणांसह पहिली आली. पुण्यात प्रथम आल्याचे समजत आहे. त्यामुळे खुप आनंदी आहे. मला ९५ टक्के गुण मिळतील अशी अपेक्षा होती. तशी तयारीही केली होती. सर्व विषयांच्या संकल्पना स्पष्ट असल्याने नियोजनबध्द अभ्यास केला. त्यामुळे अभ्यास करताना फारशा अडचणी आल्या नाहीत. या यशात आई-वडिलांचा वाटा महत्वाचा आहे. आता आयआयटीमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न सुरू आहेत.- तुषार बारनवाल
पुण्यात तुषार बारनवाल पहिला; सीबीएसईचा निकाल जाहीर
By admin | Updated: May 22, 2016 01:05 IST