गॅस टँकर उलटला, गॅस गळती सुरू

By Admin | Updated: June 14, 2014 23:38 IST2014-06-13T18:28:39+5:302014-06-14T23:38:07+5:30

एक्सेल तुटल्यामुळे गॅस टँकर उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास रिधोरा गावाजवळील वाय पॉईंटवर घडली.

Turned on gas tanker, start gas leakage | गॅस टँकर उलटला, गॅस गळती सुरू

गॅस टँकर उलटला, गॅस गळती सुरू

अकोला:   टँकरचे एक्सेल तुटल्यामुळे गॅस टँकर उलटल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास रिधोरा गावाजवळील वाय पॉईंटवर घडली. गॅस टँकरमधून प्रचंड प्रमाणात गॅस गळती होत असल्याने सतर्कता म्हणून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील दोन्ही बाजूची वाहतूक तात्पुरती वळविण्यात आली आहे. 

एचआर ३८ पी ११३८ क्रमांकाचा टँकर उरण येथून १७ हजार किलो गॅस भरून कारंजा रोडवरील धनज येथील गॅस प्लांटमध्ये जात होता; परंतु रिधोराजवळील महामार्गावर टँकरच्या टायरचे एक्सेल अचानक तुटले आणि टँकरच्या मागची चार चाके वेगळी होऊन ती रस्त्याखाली उतरली. त्यामुळे टँकर उलटला आणि त्यातून गॅस गळती सुरू झाली. ही घटना घडली त्यावेळी सुदैवाने महामार्गावर वाहनांची फारशी गर्दी नव्हती. अन्यथा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. गॅस टँकर उलटल्यामुळे टँकरमधून गॅस गळती होत असल्याची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांचा ताफा व इंडियन ऑईल कापार्ेरेशन कंपनीचे अधिकारी सकाळीच घटनास्थळावर पोहोचले. गॅस गळतीमुळे दुर्घटना घडू नये यासाठी महापालिका अग्निशमन विभागाचे बंब आणि अग्निशामक यंत्र उपलब्ध करण्यात आले होते. घटनास्थळावर नागरिकांनी एकच गर्दी केली होती; परंतु सततच्या गॅस गळतीमुळे पोलिसांनी नागरिकांना घटनास्थळावरून हुसकावून लावले.
बॉक्स: अपघातग्रस्त टँकरमधील गॅस भरण्यासाठी बोलाविला दुसरा टँकर
अपघातग्रस्त टँकरमध्ये १७ हजार किलो गॅस असल्याने या ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून इंडियन ऑईल कंपनीच्या अधिकार्‍यांनी धनज येथील गॅस प्लांटमधून एचआर ३८ के ८६६२ क्रमांकाचा दुसरा टँकर बोलाविला असून, एका रबरी पाईपच्या माध्यमातून अपघातग्रस्त टँकरमधील गॅस भरण्याचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
** इमर्जन्सी रेस्कू व्हेईकलला पाचारण
अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसर्‍या टँकरमध्ये भरणे त्रासदायक ठरत असल्याने इंडियन ऑईल कंपनीच्या अधिकार्‍यांनी जळगाव येथून इमर्जन्सी रेस्कू व्हेईकलला पाचारण केले आहे. ही व्हेईकल सायंकाळी ५ वाजतादरम्यान रिधोरा येथे पोहोचली. या इमर्जन्सी रेस्कू व्हेईकलच्या माध्यमातून अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसर्‍या टँकरमध्ये भरण्याचे काम सुरू झाले होते.

** दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा

गॅस टँकर उलटल्यामुळे खबरदारी म्हणून महामार्ग पोलिसांनी पारस फाटा आणि शेगाव टी पॉईंट या दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवून ठेवली. त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक खोळंबळी होती. रात्री ८ वाजेपर्यंत महामार्गावरील पारस फाटा आणि रिधोराजवळील नवीन राष्ट्रीय महामार्ग या दोन्ही बाजूंनी ३ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. एवढेच नाही, तर महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले आणि दोन्ही बाजूंनी बॅरिकेट्ससुद्धा लावण्यात आले होते. 

** अकोलामार्गे जाणारी वाहतूक पारसमार्गे वळवली
गॅस टँकर उलटल्यामुळे पोलिसांनी अकोलामार्गे येणारी वाहतूक पारस फाट्यापासून आणि बाळापूरमार्गे जाणारी वाहतूक शेगाव टी पॉईंटपासून वळविली. एसटी बसेस, लक्झरी, खासगी वाहने, टॅक्सी व इतर वाहने पारसमार्गे अकोल्यात येत असल्याने शेगाव रोडवरही वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती. डाबकी रोडवरील रेल्वेगेटवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या होत्या. 

** घटनास्थळावर मोबाईल व दुचाकी वाहने चालविण्यास प्रतिबंध
टँकरमधील गॅस ज्वलनशील पदार्थ असल्याने तो पेट घेऊ शकतो. यासाठी इंडियन ऑईल कंपनीच्या अधिकार्‍यांनी पोलिसांना सूचना देऊन घटनास्थळावरून दुचाकी वाहने चालविण्यास प्रतिबंध केला होता. घटनास्थळापासून १ किमी अंतरावरच पोलिस दुचाकी वाहने अडवून वाहनचालकांना दुचाकी पायी चालवत नेण्यास सांगत होते. एवढेच नाही तर खिशातील मोबाईलसुद्धा बंद करण्यास सांगत होते. मोबाईल बंद केल्यानंतरच पोलिस दुचाकी वाहने सोडत होते. 

** टँकरमधील गॅस ज्वलनशील असून, त्याची गळती होत असल्याने आम्ही महामार्गावरील दोन्हीकडील वाहतूक बंद करण्याच्या पोलिसांना सूचना दिल्या. अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसर्‍या टँकरमध्ये भरण्यासाठी जळगाव येथून इमर्जन्सी रेस्कू व्हेईकल बोलाविण्यात आली. हा टँकर उरण येथून गॅस भरून कारंजा रोडवरील धनज प्लांटमध्ये येणार होता. -  सुहास बनपूरकर, व्यवस्थापक (सुरक्षा) इंडियन ऑईल. 
सकाळी ६ वाजताच्या सुमारास टँकर पलटी झाल्याने टँकरमधील गॅस गळती सुरू झाली. त्यामुळे पोलिस व अग्निशमन विभागाला सूचना दिली आणि अग्निशमन यंत्र आणि पाण्याचे तीन बंब तैनात ठेवण्यात आले. १७ हजार किलो गॅस असल्याने खबरदारी म्हणून ग्रामस्थांनाही सतर्क करण्यात आले होते. 
 

 

 

Web Title: Turned on gas tanker, start gas leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.