मोनाटोनाचे पाणी बंद करा
By Admin | Updated: April 28, 2016 03:51 IST2016-04-28T03:51:20+5:302016-04-28T03:51:20+5:30
तालुक्यातील डाकिवली व घोणसई ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेली मोना-टोना ही टायर कंपनी दररोज लक्षावधी लीटरचा पाणी उपसा तानसा नदीतून करीत आहे.

मोनाटोनाचे पाणी बंद करा
वसंत भोईर,
वाडा- तालुक्यातील डाकिवली व घोणसई ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेली मोना-टोना ही टायर कंपनी दररोज लक्षावधी लीटरचा पाणी उपसा तानसा नदीतून करीत आहे. आणि त्याचवेळी येथील महिलांच्या नशीबी मात्र भीषण पाणीटंचाई आली आहे. या कंपनीचा हा पाणीपुरवठा त्वरीत बंद करण्याची मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख कैलास सोनटक्के यांनी केली आहे. दरम्यान, मंगळवारी ग्रामपंचायतीमध्ये याबाबत ठरावही मंजूर करण्यात आला .
तालुक्यातील जलसाठ्यांतील पाण्याची पातळी कधी नव्हेती प्रचंड खाली गेली असून परिसरातील सर्व जलसाठे कोरडे पडले आहेत. मे अखेर जी परिस्थिती उद्भवते ती परिस्थिती यावर्षी मार्च पासून जाणवू लागलीे. अनेक तलाव, नद्यातील पाणीसाठे विहिरी आटल्याने तालुक्यातील पाण्याची स्थिती भीषण बनली आहे. भूगर्भातील पाणी पातळी खाली गेल्याने बोअरवेललाही पाणी राहीलेले नाही. त्यामुळे या नदीकाठच्या गावांना तीव्र पाणीटंचाई जाणवू लागल्याने या नदीच्या पाण्यावर भाजीपाल्यांची पीके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी पीके पाण्याअभावी सोडून दिली आहेत तर शेतकऱ्यांच्या गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. (वार्ताहर)
लालफितीचा कारभार आणि ढकलाढकली
यासंदर्भात वाडा पंचायत समितीचे पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पी. बी. सरगल यांच्याशी संपर्क साधला असता मोना-टोना कंपनी घेत असलेले पाणी मार्च ते जून महिन्यापर्यंत बंद करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी आम्ही पालघर जि. प. च्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली असल्याची माहिती त्यांनी दिली.
तर वाडा पंचायत समितीचे सभापती अरूण गौंड यांच्याशी संपर्क साधला असता मोना-टोना कंपनीला पाणी उचलण्याची मुदत मार्च मध्येच संपली असून तालुक्यातील पाणीटंचाई पाहता कंपनी उचलत असलेले तानसा नदीतील पाणी बंद करण्यात यावे अशी नोटीस कंपनीला बजावून तात्काळ पाणी बंद करण्यात येईल अशी माहिती प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी दिली.
मोना-टोना कंपनीचे व्यवस्थापक पाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होवू शकला नाही.